शस्त्रतस्कर मनीष नागोरी याच्याकडून टोळ्यांना बंदुका विकल्या जात असल्याचा संशय !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर – यादवनगर येथे झालेल्या गोळीबारात कुख्यात शस्त्रतस्कर मनीष नागोरी याने बंदुका पुरवल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. अद्याप त्याला अटक झालेली नसली, तरी जिल्ह्यातील विविध गुंडांच्या टोळ्यांना शस्त्रतस्कर मनीष नागोरी याच्याकडून टोळ्यांना बंदुका विकल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इचलकरंजी येथील शस्त्रतस्कर मनीष नागोरी याच्यावर कोल्हापूर, सातारा शहर, पुणे येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शस्त्रतस्करीचे गुन्हे नोंद आहेत.

शस्त्रतस्कर मनीष नागोरी याला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्याला अटक करण्यात आली होती. नागोरी याच्यावर यापूर्वी अनेक वेळा पोलिसांकडून कारवाया केल्या गेल्या असूनही त्याच्याकडून गुन्ह्यांची मालिका थांबलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे, तरीही मग या टोळ्यांना कोण शस्त्रे पुरवते ? हा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्याही मनात येत आहे, तसेच नागोरीसारख्यांना अटक का होत नाही ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.