२ सहस्र रुपयांच्‍या नोटा पालटून घेतांना २ नक्षलसमर्थकांना अटक

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – २ सहस्र रुपयांच्‍या नोटा पालटून घेतांना २ नक्षल समर्थकांना २७ लाख ६२ सहस्र रुपयांच्‍या रकमेसह गडचिरोली पोलिसांनी अहेरी भागाजवळ अटक केली. रोहित कोरसा आणि विप्‍लव सिकंदर अशी आरोपींची नावे असून यांपैकी एका आरोपीचे नक्षलींशी संबंध होते, असे उघडकीस आले आहे. या नोटा पालटून देण्‍यासाठी नक्षलवाद्यांनी त्‍यांना २० टक्‍के दलाली (कमिशन) दिल्‍याची चर्चा आहे.

२ सहस्र रुपयांच्‍या नोटा बंद केल्‍यानंतरची ही मोठी कारवाई आहे. ३० सप्‍टेंबरपर्यंत नोटा अधिकोषात जाऊन पालटून घेण्‍याची समयमर्यादा देण्‍यात आली आहे. २ सहस्र रुपयांच्‍या नोटा बंद करण्‍याच्‍या निर्णयामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे.