संभाजीनगर, ८ जून (वार्ता.) – हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. खोटे बोलणे हे आमचे हिंदुत्व नाही. ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करणार आहे. संभाजीनगर हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वचन मी पूर्ण करणार आहे. ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ असे नामांतर केल्यानंतर नावाला सार्थ असे शहर करेन. मला घंटा बडवणारा हिंदु नको, तर आतंकवाद्यांना बडवणारा हिंदु हवा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ जून या दिवशी येथे आयोजित केलेल्या सभेत केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल, तर त्याचा मला गर्व आहे. इस्लामचा द्वेष बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितला नाही. हिंमत असेल, तर काश्मीर येथे विरोधकांनी जाऊन हनुमान चालिसा वाचून दाखवावी. मर्द असाल, तर काश्मिरी पंडितांचे रक्षण करा. शिवसेना दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. संभाजीनगर येथील पाणीयोजनेला एकही पैसा अल्प पडू देणार नाही. झारीतील शुक्राचार्यांना शोधून शहरातील पाणीप्रश्न मिटवणार आहे. माझ्या संभाजीनगरला पाणी मिळाले पाहिजे, तसेच संभाजीनगर येथे मेट्रो झालीच पाहिजे. विमानतळ नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे, त्याचे काय झाले ? मी आताही शहराचे नाव पालटू शकतो; मात्र नाव पालटले आणि पाणीप्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले, तर छत्रपती संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. निवडणुका जिंकायच्या म्हणून घाईत येथे मेट्रो आणि इतर विकासकामांची घोषणा करणार नाही. व्यवस्थित नियोजन करून आराखडा सिद्ध करणार आणि मगच विकास करणार आहे. विकासाच्या नावावर शहर उद्ध्वस्त करणार नाही.