‘आम्ही डोंबिवलीहून गोवा येथे रहायला येण्याआधी मला ‘मधुमेह, उच्च रक्तदाब आणि पायांतील नसांत रक्ताच्या गुठळ्या होणे’, असे अनेक शारीरिक त्रास होते. एकदा मी नवी मुंबई येथील एका पुलावर चक्कर येऊन पडलो होतो. अशी शारीरिक स्थिती असतांना आम्ही गोवा येथे रहायला आलो. आम्ही साडेचार वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहोत. आम्ही येथे आल्यावर साधना करत असतांना आमच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
१. आश्रमात आल्यावर घेतलेले उपचार आणि सेवा यांमुळे अनेक शारीरिक त्रास दूर होणे
मी आश्रमात सेवा करू लागल्यानंतर आणि विविध उपचारपद्धती करून घेतल्यानंतर मला होत असलेले ‘पायांतील नसांत रक्ताच्या गुठळ्या होणे अन् उच्च रक्तदाब’ हे त्रास दूर झाले. माझा मधुमेहही पूर्ण नियंत्रणात आहे.
२. पत्नीचे मायेतील बोलणे उणावणे आणि साधनेचे विचार वाढणे
माझी पत्नी सौ. आरती हिला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. गोवा येथे येण्याआधी ती नेहमी रात्री मायेतील विषयांवर बोलत असे. मी तिला याविषयी सकाळी काही सांगितल्यावर ती म्हणायची, ‘‘मी असे कुठे म्हणाले ?’’ आता तिच्या मनात मायेतील विचार येण्याचे प्रमाण अल्प होऊन तिच्या मनात साधनेचे विचार वाढले आहेत.
३. पती-पत्नींची स्वीकारण्याची वृत्ती वाढणे
आम्ही घरी असतांना आम्हा दोघांमध्ये काही मतभेद झाले, तर आम्ही ते रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारी आमची मुलगी कु. मानसी हिला सांगतो. तिने दिलेला दृष्टीकोन आम्ही दोघेही स्वीकारतो; कारण तिने दिलेला दृष्टीकोन साधनेच्या स्तरावरचा आणि योग्य असतो.
४. आम्हाला साधना करतांना पुष्कळ उत्साह जाणवतो. आमच्या जीवनाला एक चांगले वळण लागले आहे.
५. प्रार्थना आणि कृतज्ञता
देवाने आम्हाला साधनामार्गावर आणले. त्यासाठी आम्ही कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘साधना करतांना येणारे सर्व अडथळे दूर होऊन आम्हाला गुरुचरणी लीन करून घ्यावे’, हीच ईश्वरचरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– श्री. अरुण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०२१)