लाचखोरीत पुणे शहर प्रथम क्रमांकावर !

वर्षभरात पुण्यात सर्वाधिक पोलीस आणि अधिकारी यांवर कारवाई !

पुणे – येथे विविध प्रकरणांत लाच घेतांना गेल्या वर्षभरात सर्वाधिक अधिकारी आणि पोलीस सापडले आहेत. पोलीस विभागात १७३ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये एसीबीने (लाचलूचपत प्रतिबंधक विभाग) राज्यभरातून २५५ जणांना लाच घेतांना अटक केली. आरोपींमध्ये वर्ग एक दर्जाचे अनुमाने ८, तर वर्ग दोनच्या १९ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. याचा अर्थ लाच घेण्याची प्रकरणे जितकी घडली, त्याच पटीत ती देणार्‍यांचीही संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले; म्हणजेच पुणे शहर लाच देणार्‍यांतही पहिल्या क्रमांकावर आहे. लाचखोरीत द्वितीय स्थानावर संभाजीनगर आहे, तर नागपूर तिसर्‍या स्थानी आहे.

गुन्हेगारीसाठी अपकीर्त असलेल्या मुंबईचा क्रमांक आश्चर्यकारकरीत्या या सूचीत आठव्या स्थानी आहे. राज्यात लाचखोरीत द्वितीय स्थानावर महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभाग असून या विभागांमध्ये १७८ कारवाया करण्यात आल्या. यात २५२ जणांना लाच घेतांना अटक करण्यात आली. पंचायत समितीमध्ये ५७ सापळे रचण्यात आले. यात ७८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली, तसेच राज्य विद्युत् वितरक आस्थापन आणि महानगरपालिका विभागावर ५१ कारवाया करत अनुक्रमे ६८ आणि ७७ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. (प्रत्येक क्षेत्रातील लोकांची वृत्ती भ्रष्ट होत असल्याची उदाहरणे समोर येणे हे गंभीर आहे. – संपादक)