वैदिक धर्मात सांगितलेली आदर्श हिंदु स्त्री
१. वैदिक धर्मातील स्त्रीचे स्थान
‘आपल्या वैदिक धर्मात स्त्रीला पुष्कळ मोठे स्थान आहे. शास्त्रांनी तिला ‘ब्रह्मशक्तीचे, आदीशक्तीचे’ रूप म्हटले आहे. वेदांमध्ये स्त्रियांनी रचलेल्या ऋचा आहेत. शास्त्रज्ञ पंडितांच्या सभेत स्त्री-पंडितांनी उच्च कोटीचे आध्यात्मिक प्रश्न विचारल्याचे प्रसंग आहेत. मैत्रेयी, गार्गी ही त्यांची सनातन उदाहरणे होत.
२. आधुनिक विज्ञानाने स्त्रीला मुभा दिल्याने आजची स्त्री स्त्रीत्व विसरून भुलभुलैयात सापडणे
उच्च आदर्श, उज्ज्वल इतिहास, अत्यंत त्यागशील प्रतिमा असूनही आज भारतीय नारी अतृप्त, अशांत, दुर्लक्षित आणि उपेक्षित अशीच आहे. पूर्वीच्या कर्मठ विचारसरणीमुळे स्त्री जखडली गेली होती; म्हणून आधुनिक विज्ञानाने स्त्रीचा अनेक क्षेत्रांतील दर्जा उंचावून दिला. तिला स्वतंत्र केले. तिला सर्व गोष्टींत मुक्त संचार करण्याची मुभा दिली. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सर्वच क्षेत्रांत पुढे जाणारी आणि स्वतःला धन्य समजणारी आजची स्त्री नसत्या भुलभुलैयात सापडून पुरुषाळली आहे. आपला महान आदर्श, अवतारी महापुरुषांनी दाखवून दिलेला स्त्रीधर्म, मातृभावच नव्हे, तर ती तिचे स्त्रीत्वही विसरायला लागली आहे. आठवून पहा सीतेने दाखवून दिलेला स्त्रीधर्म ! वाचून पहा मैत्रेयी आणि गार्गी यांच्या आध्यात्मिक सभा; पण हे सर्व स्त्री विसरायला लागली आहे.
आपले शास्त्र स्त्रीला पूर्ण स्त्री आणि पुरुषाला पूर्ण पुरुष व्हायला सांगते. स्त्रीने पुरुषांसारखे वागणे, हा खरेतर स्त्रीत्वाचा अपमान आहे. कुणी पुरुष कधी साडी नेसून वेणी घालून असतो का ? मग आम्हा स्त्रियांना स्त्रीत्वाचा न्यूनपणा का वाटावा ?
३. उपाय
३ अ. स्त्रीने आधुनिक आणि वेदांतिक अशा दोन्हींचा मेळ घालून प्रगतीच्या मार्गावर पाऊल टाकावे ! : स्त्रीमन हे सर्वकाळी स्त्री-मनच रहात असते. काळ कितीही पालटला किंवा प्रगती झाली, तरी स्त्री-मन कसे पालटेल ? आजची सुशिक्षित स्त्री एवढी प्रगतीशील असूनही अतृप्तच आहे. याला कारण स्त्रीचा आदर्श दृष्टीआड होत आहे. यावर उपाय म्हणजे स्त्रीने आधुनिक आणि वेदांतिक अशा दोन्हींचा मेळ घालून पुढे पाऊल टाकावे.
३ आ. स्त्रीने स्वतःसमोर ‘मला काय बनायचे आहे ?’, याचा आदर्श ठेवून ती पूर्णत्वाला पोचू शकते ! : आजच्या स्त्रीने हे लक्षात ठेवावयास हवे की, आधुनिक विचारसरणीच्या समवेत मानसिक उन्नयन (उदात्तीकरण) आणि सुसंस्कृतपणा महत्त्वाचा आहे. आधुनिक विज्ञानाने स्त्रीला स्वच्छंद आणि स्वतंत्र केले. जगाचा उपभोग घेण्यास शिकवले. त्याचा परिणाम म्हणूनच आज पुन्हा एकदा आपल्या आदर्शांवर चिंतन करण्याची वेळ आली आहे.
१. स्त्रीला स्वतःच्या पायावर उभे राहून जगायचे असेल, तर ती आदर्श पुढे ठेवून पूर्ण होऊ शकते.
२. स्त्रीला ‘गृहिणी’ म्हणून जगायची इच्छा असेल, तर ती गृहिणी असूनही पूर्णत्वाला पोचू शकते.
३. आदर्श माता बनून जगायचे असेल, तरीही ती त्याच्यातूनही पूर्णत्वाला पोचू शकते.
४. एखादी प्रौढ विधवा असेल, तर तिलाही निराश व्हायचे कारण नाही. तीही आदर्श समोर ठेवून पूर्णत्वाला पोचू शकते.’
– सौ. अरुणा खेर
(साभार : मासिक ‘जीवन-विकास’ ऑगस्ट १९९४)
स्त्री-स्वातंत्र्याच्या चळवळीने कुणाचेच भले झाले नाही !‘जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापिठात तृतीय वर्षात कायद्याचा अभ्यास करत असलेल्या कु. मोना शॅरेन हिने काही वैयक्तिक उदाहरणांचा अभ्यास (Case studies) केला. त्यावरून असाच निष्कर्ष निघतो, ‘स्त्रियांच्या भाषणबाजीकडे जपूनच पाहिले पाहिजे.’ वस्तूतः स्त्री स्वातंत्र्यवादी ही सामान्यतः एक स्त्रीच असते. तिला ‘खरे काय हवे आहे ?’, हे ठाऊक नसले, तरी ‘ती ठरवते ते तिला काही झाले, तरी पाहिजे असते.’ आरंभीच कु. शॅरेन हिने अमेरिकन स्त्रियांच्या ‘प्रणयकथा वाचण्याविषयीच्या अनिवार इच्छा’विषयीचे सूत्र विचारात घेतले. आधुनिक स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांना ‘स्त्रियांवरील बलात्काराच्या कथा, विशेषतः अमीर-उमरावांनी बलात्कार केलेल्या कथा मध्यरात्री वाचायला आवडतात’, असाच याचा अर्थ घ्यायचा का ? या विचाराची तुलना तिने एका दशकापूर्वी स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीचा ध्वज आरंभीच्या काळात खांद्यावर घेणार्या कु. सुसान ब्राउनमिल्लर हिच्या ‘सर्व पुरुष, संधी मिळत नाही; म्हणून छुपे बलात्कारी असतात’, या उद्गाराशी केली. कु. शॅरेन विचारते, ‘‘मी माझ्या नातवंडांना काय सांगू ?’’ ‘१९८३ पर्यंत आम्ही भिन्न लिंगांमधील परस्पर गैरसमजाचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे ? स्त्रियांच्या दृष्टीने सर्व पुरुष संभाव्य बलात्कारी आणि पुरुषांच्या दृष्टीने सर्व स्त्रिया बलात्कारासाठी आसुसलेल्या असतात का ?’ (साभार : मासिक ‘प्रज्ञालोक’, सप्टेंबर १९८४) |
स्त्रीमुक्तीची चळवळ आणि तिचा परिणाम‘स्त्रीमुक्ती चळवळीच्या विजयासाठी स्त्रीला फार मोठे मूल्य द्यावे लागले आहे. स्त्रीमुक्ती चळवळीच्या विजयाची लूट म्हणजे माझ्या पिढीला पुष्कळ उत्पन्न, आमच्या स्वतःच्या ‘सिगरेटी’, एकटे राहून मातृत्व स्वीकारण्याचा पर्याय, बलात्कारांचे अड्डे, कर्ज मिळवण्याचे वैयक्तिक मार्ग, मुक्त प्रेमाचे स्वातंत्र्य आणि स्त्री स्त्रीरोग तज्ञ दिले आहेत. याच्या बदल्यात आमच्यापासून बरेच काही हिरावून घेण्यात आले आहे. ते म्हणजे बहुतेक स्त्रियांचे सुख ज्यांच्यावर अवलंबून असते, ते ‘पुरुष’ ! (साभार : ‘हिंदुस्थान टाइम्स’, २०.३.१९८४) |
भारतीय संस्कृतीचा आधार सहकार्य आहे, स्पर्धा नाही !‘पुण्याच्या ‘वाडिया कॉलेज’मधील प्राध्यापिका कु. फेरेजकुवर भरूचा यांनी पुणे विद्यापिठाला आचार्य पदवीसाठी सादर केलेल्या आपल्या प्रबंधातील एका विवेचनात्मक प्रकरणात असे नमूद केले आहे की, भारतीय स्त्रियांनी आत्मसात् केलेल्या संस्कृतीचा आधार ‘सहकार्य’ आहे. ती स्पर्धा नाही, तर समष्टीशी एकात्मता आहे. तिच्यापासून दूर जाणे नाही.’ (साभार : ‘नागपूर टाईम्स’, २६.६.१९८४) |