गावासाठी चांगले रस्ते होईपर्यंत विवाह न करण्याच्या तरुणीच्या निर्धाराची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली नोंद !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत चांगले रस्तेही न देऊ शकणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते देशाला लज्जास्पद ! – संपादक

बिंदू

दावणगेरे (कर्नाटक) – येथील रामपुरा गावामध्ये रस्ते खराब असल्यामुळे गावात अनेक समस्या असून गावात चांगले रस्ते येईपर्यंत मी विवाह करू शकत नाही, अशी तक्रार येथील बिंदू नावाच्या एका २६ वर्षीय तरुणीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट इमेल करून केली आहे. बिंदू गावात एकटीच शिक्षित आहे. विवाह करून अन्यत्र गेल्यानंतर गावासाठी लढा देणारे कुणीच उरणार नाही, अशी भीती तिला वाटत असल्याने तिने हा निर्धार केला आहे. बिंदू हिच्या पत्राला मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद देण्यात आला आणि ‘ही समस्या तातडीने सोडवली जाईल’, असे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाला यासंदर्भातले निर्देश देखील देण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बिंदू हिने लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आमच्या गावात चांगले रस्ते नाहीत. त्यामुळे इतर गावांशी संपर्क वा दळणवळण अवघड होऊन बसते. त्यामुळे आमचे गाव अजूनही मागास आहे. गावापासून महाविद्यालयात जाण्यासाठीही चांगला रस्ता नसल्यामुळे मला वसतीगृहामध्ये रहावे लागले होते. आमच्या गावात मुलांसाठी ५ वीपर्यंत शाळा आहे; मात्र जर कुणाला पुढे शिकायचे असेल, तर प्रतिदिन १४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.