अधिवक्ता रामदास केसरकरकाका मुंबई येथील उच्च न्यायालय आणि ठाणे येथील जिल्हा न्यायालय येथे वकिली व्यवसाय करत होते. साधारणतः २७ वर्षांपूर्वी त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाला. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला केसरकरकाकू यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. मागील १५ वर्षांपासून केसरकरकाका त्यांच्या पत्नीसह सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. केसरकरकाकूंना कर्करोग झाला आहे. काका काकूंची सर्व सेवा न थकता न कंटाळता आणि कुठलेही गार्हाणे न करता आनंदाने करत आहेत.
परात्पर गुरुमाऊलीच्या छत्रछायेखाली राहिल्यामुळे त्या दोघांनाही हे प्रारब्ध भोगणे सुसह्य होत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अधिवक्ता रामदास केसरकरकाका आणि सौ. प्रमिला केसरकरकाकू यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेल्या भावस्पर्शी संवादातील काही अनमोल, मार्गदर्शक आणि साधनेमध्ये प्रेरणा देणारी सूत्रे दोन भागांमध्ये पाहिली आहेत. या लेखात उर्वरित सूत्रे पुढे दिली आहेत.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/500707.html
१५. वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवक्ता केसरकर यांना आश्रमजीवनाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी पत्नीसह रामनाथी आश्रमात रहायला येणे
अधिवक्ता रामदास केसरकर : वर्ष २००६ मध्ये मी रामनाथी आश्रमात आपल्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) बाजूच्या खोलीत रहायला आलो होतो. त्या वेळी आपण (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला म्हणाला होतात, ‘‘तुम्ही आश्रमजीवन जगले पाहिजे आणि त्यासाठी आश्रमात राहिले पाहिजे.’’ तेव्हा मी आपल्याला म्हणालो, ‘‘मी आश्रमात रहाणार नाही.’’ त्यावर आपण मला म्हणालात, ‘‘काय अडचण आहे ?’’ मी सांगितले, ‘‘मला स्वतंत्र खोली लागते.’’ मग आपण मला म्हणालात, ‘‘माझ्या बाजूची खोली तुम्हाला देतो.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘ठीक आहे.’’ त्यानंतर मी येथे रहायला आल्यावर मला एक खोली देण्यात आली. त्या वेळी मला ६ घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले होते. वर्ष २००७ मध्ये काकूही येथे रहायला आल्या. आधी काकू कुडाळला रहात होत्या. आपल्या कृपेनेच आम्ही येथे (आश्रमात) राहिलो. आमच्या खोलीत सूर्यही आहे आणि रात्री चंद्रही आहे. (या खोलीचे वैशिष्ट्य, म्हणजे खोलीतून दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र दिसतो.)
१६. ‘काका आणि काकू दोघेही एकमेकांसह साधनेत पुढे जात आहेत’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले (केसरकरकाकूंना उद्देशून) : यांना (केसरकरकाकांना) साधनेतील काही सांगायला पाहिजे का ?
सौ. प्रमिला केसरकर : काकांनी थोडे अंतर्मुख व्हायला पाहिजे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यांचे काही स्वभावदोष दिसतात का ?
सौ. प्रमिला केसरकर : स्वभावदोष माझ्या लक्षात येत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मग ‘अंतर्मुखता पाहिजे’, असे तुम्ही म्हणता. ते कशासाठी ?
सौ. प्रमिला केसरकर : ‘कुणी साधक दिसले, तर आवश्यकता नसतांना त्यांना बोलावणे आणि त्यांच्याशी बोलणे’, असे यांच्याकडून होते. तो साधक सेवेत व्यस्त असतांना असे करायला नको.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हे बरोबर आहे. अगदी छान सांगितले ! इथे बसून सगळे सांगता; म्हणून दोघे हात धरून पुढे गेलात. केवळ सप्तपदीतच नाही !
अधिवक्ता रामदास केसरकर : सप्तपदीचे सार्थक झाले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्याकडे ‘नवरा-बायको दोघेही जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटले’, असे फार अल्प आहेत. त्यांना पुढचा जन्म नाही.
अधिवक्ता रामदास केसरकर : सगळी तुमची कृपा !
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही किती वर्षे साधना केलीत ? वर्ष १९९४ पासून ना ?
सौ. प्रमिला केसरकर : हो. २७ वर्षे झाली.
१७. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि केसरकर दांपत्य यांना ‘एकमेकांना भेटावे’, असे वाटणे
सौ. प्रमिला केसरकर : परम पूज्य, आम्हाला पुष्कळ दिवसांपासून ‘तुम्हाला भेटावे’, असे वाटत होते. मी रुग्णाईत झाल्यापासून तुम्हाला भेटले नव्हते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आश्चर्यच ! दोन दिवसांपूर्वीच मला ‘तुम्हाला भेटायला जावे’, असे वाटत होते. योग कसा जुळून आला !
१८. ‘प्रारब्ध भोगायचे राहिले, तर ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
अधिवक्ता रामदास केसरकर : वेदना स्थूलदेहाला असतात आणि नामजप ही सूक्ष्म देहाची साधना आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो.
अधिवक्ता रामदास केसरकर : काकूंचे दुखणे पुन्हा चालू झाले. तेव्हापासून उपचार करण्यासाठी माझी धावपळ चालू झाली.
परात्पर गुरु डॉ. आठवले (केसरकरकाकूंना) : वेदनेमुळे कधी रडत नाही ना ?
सौ. प्रमिला केसरकर : एक-दोनदा रडले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : केवळ एक-दोनदाच ? इतकी वर्षे, इतके मास इतक्या वेदना होत आहेत, तरी केवळ एक-दोनदाच रडलात ?
अधिवक्ता रामदास केसरकर : देवाने त्यांची पूर्ण काळजी घेतली.
सौ. प्रमिला केसरकर : एक-दोनदा रडले. ‘देवा, मला माझ्या वेदना सहन होत नाहीत. मला लवकर मृत्यू येऊ दे’, असेही मी म्हटले. काही वेळाने माझ्या लक्षात आले, ‘आपले प्रारब्ध संपल्याविना आपण कुठेच जाऊ शकत नाही.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रारब्ध भोगायचे राहिले, तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल.
सौ. प्रमिला केसरकर : मृत्यूही प्रारब्धानेच येतो. ती माझी स्वेच्छा झाली. ‘चूक झाली’, असे लक्षात आले. मग मी क्षमा मागितली.
१९. ‘महर्, जन, तपस् या उच्च लोकांतील जीवन आनंदी असल्यामुळे तिकडे जायचे आहे आणि पुन्हा पृथ्वीवर यायचे नाही’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी काकूंना सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : हा जन्म लवकर संपू दे. तिकडचे जीवन आनंदी आहे. आता पृथ्वीवरचे जीवन नको. आता मीही त्याचीच वाट पहात आहे.
सौ. प्रमिला केसरकर : रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘याच्यापुढे माझ्याकडे काही इलाज (उपाय) नाही. आता तुम्हाला हे सर्व त्रास सहन करावे लागतील.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो ना ! आधुनिक वैद्यांनी असे सांगितले ? म्हणजे ते फसवे आधुनिक वैद्य नाहीत.
सौ. प्रमिला केसरकर : परम पूज्य, तुम्ही आलात. पुष्कळ बरे वाटले.
२०. ‘शब्दांतील नामजपापेक्षा भाव महत्त्वाचा आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकूंना सांगणे
सौ. प्रमिला केसरकर : २ – ३ दिवसांपूर्वी मला स्वप्नात एक दृश्य दिसले होते, ‘पुष्कळ मोठे सभागृह आहे. ते सभागृह पूर्ण भरलेले होते. तुम्ही तिथे आलात. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील तुमच्या छायाचित्रात तुम्ही जसा वेश परिधान केला आहे, तसाच वेश त्या वेळी तुम्ही परिधान केला होता. ते पूर्ण सभागृह प्रकाशित झाले होते आणि मला तेथे पुष्कळ चैतन्य मिळाले.’ परम पूज्य, त्या वेळी ‘माझा नामजप अल्प होतो’, असे मला जाणवले होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : शब्दातील नामजप झाला नाही, तरी मनात भाव असतो ना ?
सौ. प्रमिला केसरकर : हो. तो असतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तो महत्त्वाचा ! शब्दांना किंमत नाही.’
– अधिवक्ता रामदास केसरकर (सनातनचे कायदेविषयक मानद सल्लागार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२६.७.२०२१)
अधिवक्ता रामदास केसरकर आणि सौ. प्रमिला केसरकर यांचा ‘निर्विचार’ हा जप चांगला होणे अन् त्यातून त्यांना आनंद मिळणे
‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपेने सौ. प्रमिला (पत्नी) यांचा ‘निर्विचार’ हा जप चांगला होत असून त्या आतून आनंदी आहेत’, असे मला जाणवते. मला त्यांच्या तोंडवळ्यावर तेजही जाणवते. आपल्या कृपेने माझाही ‘निर्विचार’ हा जप चांगला होत आहे आणि त्यातून मला आनंदही मिळत आहे.’ – अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२५.७.२०२१)
‘परिस्थिती स्वीकारली की, आपल्याला आनंद मिळतो’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वचन प्रत्यक्ष अनुभवणारे अधिवक्ता रामदास केसरकर आणि सौ. प्रमिला केसरकर !
‘परात्पर गुरु डॉक्टर, ९.११.२०२० या दिवशी आम्ही रुग्णालयात असतांना आपण मला निरोप पाठवला होता, ‘एवढ्या कठीण प्रसंगातही तुम्ही दोघे आनंदी दिसता. ‘आपण आलेली परिस्थिती स्वीकारली की, आपल्याला आनंद मिळतो’, हे जीवनात नेहमीच लक्षात ठेवा !’ आपले हे आशीर्वचन आपल्या कृपेमुळे आम्ही प्रत्यक्षात अनुभवत आहोत.’ – अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२१)