विद्यार्थी परिषदेचे एम्.आय.टी. विद्यापिठाच्या विरोधात ‘विमान उडाव’ आंदोलन !

‘एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’

पुणे – एम्.आय.टी. खासगी विद्यापिठाने आंतरराष्ट्रीय अभ्यास दौर्‍यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले; मात्र कोरोनामुळे आणि दळणवळण बंदी असल्याने हा अभ्यास दौरा झाला नाही. असे असूनही एम्.आय.टी.ने या दौर्‍यासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत न केल्याने विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी २३ जून या दिवशी ‘एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’च्या कोथरूड येथील आवारात ‘विमान उडाव’ आंदोलन केले. दळणवळण बंदीमुळे आता न झालेला अभ्यास दौरा कालांतराने आयोजित केला जाईल, विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापिठातील प्रशस्तीपत्र अभ्यासक्रम करता येईल किंवा शुल्कामध्ये समायोजित केला जाईल, असे पर्याय संस्थेने दिले होते; मात्र शुल्क परत करण्याच्या संदर्भात कोणत्याही हालचाली केल्या नसल्याचे विद्यार्थ्यांनी या वेळी सांगितले. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन काही वेळानंतर त्यांची सुटका केल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सांगितले.

अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते एम्.आय.टी.ला नाहक बदनाम करीत आहेत. ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही पुढील तीन वर्षांत अभ्यास दौरा होऊ शकेल, नामांकित परदेशी विद्यापिठातील ‘ऑनलाईन’ अभ्यासक्रम करता येईल आणि वरील दोन्ही पर्याय मान्य नसल्यास विद्यार्थ्यांचे पैसे परत केले जातील, असे पर्याय दिल्याचे ‘एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर यांनी सांगितले.