नगर – केवळ देशी दारूने कोरोना बरा होतो असा माझा दावा नाही. नेहमीची अॅलोपॅथिक औषधे आणि प्रमाणित मात्रेत ‘अल्कोहोल’ घेतल्यास कोरोना रुग्ण बरा होतो, असा अनुभव सांगितला आहे. यात कुणाचीही दिशाभूल करण्याचा उद्देश नाही. यासंबंधीची ‘पोस्ट’ मागे घेत असून ‘टास्क फोर्स’ने मान्यता देईपर्यंत कुणीही देशी दारूचा प्रयोग करू नये, असे म्हणत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी त्यांचा दावा मागे घेतला आहे. ‘यानंतरही कुणी असा उपचार केला, तर होणार्या परिणामांना तुम्हीच उत्तरदायी असाल’, अशी चेतावणीही त्यांनी नागरिकांना दिली आहे. तसेच श्वसनसंस्थेच्या आजारावर अल्कोहोल उपयुक्त ठरते, याला आयुर्वेदात शास्त्रीय आधार असून त्यांचे शास्त्रीय अनुभव वरिष्ठ तज्ञ समिती समोर मांडण्यास त्यांनी संमती मागितली आहे.
३ दिवसांपूर्वी डॉ. भिसे यांनी एक ‘पोस्ट’ लिहून कोरोना रुग्णाला काही दिवस प्रतिदिन ६० मिलीलीटर देशी दारू पाजल्यास कोरोना लवकर बरा होतो, असा दावा केला होता. त्यांनी स्वत: हा प्रयोग ५० रुग्णांवर केल्याचेही नमूद केले होते. आरोग्य विभाग आणि प्रशासन यांनी याची नोंद घेऊन डॉ. भिसे यांना नोटीस पाठवली होती. या नोटिसीला डॉ. भिसे यांनी उत्तर दिले आहे
त्यानंतर भिसे यांनी सामाजिक माध्यमावरील स्वत:ची मूळ ‘पोस्ट’ काढून आणखी एक नवी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ज्या रुग्णांवर मी हा प्रयोग केला, त्यांच्यावर सरकारने प्रमाणित करून दिलेले उपचारही चालू ठेवले होते. माझ्या ‘पोस्ट’चा चुकीचा अर्थ काढून कुणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये.