ध्वनीप्रदूषणाविषयी सर्वांत अधिक तक्रारी आलेल्या हणजूण परिसरातील ५ उपाहारगृहांना उच्च न्यायालयाची नोटीस

म्हापसा, ३० ऑगस्ट (वार्ता.) – ध्वनीप्रदूषणाविषयी सर्वांत अधिक तक्रारी आलेल्या हणजूण परिसरातील ५ उपाहारगृहांना उच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्व ५ उपाहारगृहांना पक्षकार ठरवले आहे. उच्च न्यायालयाने आदेश देतांना ध्वनीप्रदूषणाविषयी निरीक्षण करण्यासाठी सरकारकडून घालण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे गृहित धरली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हणजूण पोलीस ठाण्यांमध्ये पोलिसांची ३ पथके सिद्ध करण्यात येतील आणि नागरिक या पोलीस पथकांकडे तक्रार करू शकतात. त्यानंतर ३० मिनिटांमध्ये त्याविषयी कोणतीही कृती न झाल्यास विभागीय पोलीस अधिकार्‍याने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ सप्टेंबर २०२४ या दिवशी होणार आहे.