कला अकादमीच्या ढासळत्या वास्तूची समस्या मांडण्यासाठी कलाकारांची आज विशेष बैठक

ढासळत्या वास्तूविषयी सरकारला निवेदन देऊनही सरकारने दुर्लक्ष केल्याचा कलाकारांचा दावा

पणजी, १६ जून (वार्ता.) – कला अकादमीच्या ढासळत्या वास्तूकडे वारंवार सरकारचे लक्ष वेधूनही सरकार त्याकडे कानाडोळा करत असल्याने या सांस्कृतिक स्थळाचे योग्य तर्‍हेने जतन व्हावे, याविषयी चर्चा करण्यासाठी गोव्यातील सर्व कलाकारांनी एकत्र येण्याची सिद्धता चालू केली आहे. राज्यातील कलात्मक अभिव्यक्ती आणि वारसा यांचे केंद्र असलेल्या कला अकादमीच्या वास्तूचे जतन अन् संवर्धन करण्याची आवश्यकता आहे, असे बहुतांश कलाकारांचे मत असल्याने त्यासाठी सामूहिकरित्या कृती करण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.

यासंबंधी प्रसिद्ध कलाकार राजदीप नाईक म्हणाले, ‘‘कला अकादमीतील संरचनात्मक समस्या आणि सादरीकरणासाठी कलाकारांना भेडसावणारी आव्हाने याविषयी कला अकादमीच्या कार्यालयातून किंवा संबंधित अधिकार्‍यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. कला अकादमीला प्रत्यक्षात भेट देऊन येथील परिस्थिती आणि कलाकारांसमोर असलेल्या समस्या जवळून पहाण्याची अन् त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.’’ या पार्श्वभूमीवर कला अकादमीची स्थिती आणि पुढील वाटचाल याविषयी चर्चा करण्यासाठी १७ जून २०२४ या दिवशी कलाकारांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला तियात्र (कोकणी नाटकातील एक प्रकार) कलाकार, तसेच इतर कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. ही बैठक कोणतेही आंदोलन किंवा निदर्शने करण्यासाठी नाही, तर कला अकादमीच्या संदर्भात कलाकारांची मते जाणून वास्तूच्या संरक्षणासाठी पुढील कृती निश्चित करण्याच्या संदर्भात आहे.