पणजी, १३ जून (वार्ता.) – विधानसभा इमारतीच्या छताला अनेक ठिकाणी पुन्हा गळती लागली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने गळती रोखण्यासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्चून ‘वॉटर प्रूफ्रिंग’चे काम (पाणी झिरपण्यापासून रोखण्याचे काम) हाती घेतले आहे, अशी माहिती विधानसभेचे संयुक्त सचिव हरक्युलस नोरोन्हा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
विधानसभा इमारतीला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि वर्ष २०२१ पासून सातत्याने छताला गळती लागत आहे. यंदा पावसाळा चालू होताच पुन्हा छताला गळती लागली आहे. संयुक्त सचिव हरक्युलस नोरोन्हा म्हणाले, ‘‘पावसाळ्यात पावसाचे पाणी इमारतीवरून खाली आल्यानंतर ज्या भागातून पाण्याचा निचरा होतो, तेथून इमारतीला गळती लागत आहे. इमारतीतील इतर काही सभागृहे आणि ‘केबिन्स’ (कक्ष) यांनाही वारंवार गळती लागत आहे. ही कामे पूर्ण करण्यासंबंधी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांसमवेत बैठक झालेली आहे.’’ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै मासात होणार्या पावसाळी अधिवेशनात गळतीचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि पावसाळ्यानंतर पुन्हा छताची पहाणी करून उर्वरित सर्व कामे हाती घेतली जाणार आहेत. विधानसभा इमारत नव्याने उभारण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे समजते.