मोरजी समुद्रकिनार्‍याला ध्वनीप्रदूषणाचा धोका !

अनेक तक्रारी करूनही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा निष्क्रीय

म्हापसा, ३० मे (वार्ता.) – मोरजी समुद्रकिनारा हा कासवांची पैदास होते. या दृष्टीने मोरजी समुद्रकिनारा शासनाने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केला आहे; मात्र मोरजी-मांद्रे समुद्रकिनारपट्टीवरील उपहारगृहे आणि क्लब यांच्या ध्वनीप्रदूषणामुळे येथील पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पर्यटन हंगाम नसतो, तेव्हा ध्वनीप्रदूषण अल्प प्रमाणात असते; परंतु पर्यटन हंगामात सातत्याने ध्वनीप्रदूषण केले जाते. याविषयी स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्या जातात; मात्र यानंतर अल्प कालावधीसाठीच ध्वनीप्रदूषणाला आळा बसतो आणि नंतर पुन्हा ध्वनीप्रदूषण चालू होते.

स्थानिकांच्या मते गावडेवाडो, मोरजी येथे भरती रेषेपासून १०० मीटरहून अल्प अंतरावर असलेले ‘अन्टी सोशल’ या क्लबमधून दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण होत असते. या क्लबमधून सातत्याने संगीताचे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे मोठ्या आवाजाने ध्वनीक्षेपक लावून ध्वनीप्रदूषण होत असते. हा क्लब स्थानिकांच्या तक्रारी किंवा पर्यावरणाचे रक्षण करण्याकडे दुर्लक्ष करतो. मोरजी समुद्रकिनार्‍यावर नियमानुसार संगीत वाजवता येत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नेमलेल्या ‘ध्वनीप्रदूषण देखरेख समिती’चे सदस्य निवृत्ती शिरोडकर यांनीही ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात तक्रार करूनही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कारवाई करत नसल्याचा आरोप केला. यामुळे ‘ध्वनीप्रदूषण देखरेख समिती’ विसर्जित करणेच योग्य ठरेल, असे ते उपरोधिकपणे म्हणाले. स्थानिक नागरिक शेटगावकर यांच्या मते गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनीप्रदूषण मोजण्यासाठी मोरजी येथे यंत्रे ठेवली आहेत; मात्र ती ध्वनीप्रदूषण करणार्‍या आस्थापनापासून दूर ठेवलेली आहेत. स्थानिकांच्या मते हणजूण-वागातोर येथे क्लबच्या विरोधात स्थानिकांची मोहीम आरंभल्याने हे क्लब आता मोरजी येथे स्थलांतरित होऊ लागले आहेत.

संपादकीय भूमिका 

यास उत्तरदायी असलेले पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे !