१. पोलीस कोठडीत पती-पत्नीचा मृत्यू
बिहारमधील अर्रिया जिल्ह्यातील ताराबादी पोलीस ठाण्यातील एक प्रकार समोर आला. मठ्ठू सिंह यांची पत्नी मृत झाल्याने त्यांनी त्यांच्या अल्पवयीन मेहुणीशी लग्न केले. त्यामुळे दोघांनाही अटक करून पोलीस ठाण्यामध्ये डांबण्यात आले. दुसर्या दिवशी त्या दोघांचाही पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याची तोडफोड करून ते पेटवून दिले. यात काही पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात २ ग्रामस्थ घायाळ झाले. पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस कोठडीत असतांना किती आरोपींचा मृत्यू झाला, हे जगजाहीर आहे. असे असतांनाही त्या दोघांनी पोलीस ठाण्यात आत्महत्या केली, असे सांगण्याचे धाडस पोलीस करतात. यावर विश्वास ठेवायचा का ? ग्रामस्थांनी केलेल्या संतप्त निदर्शनानंतर वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ५ पोलिसांना निलंबित केले. तसेच पोलीस ठाणे पेटवून देणे आणि पोलिसांवर दगडफेक करणे या कारणांनी गुन्हा नोंदवून जमावातील १९ व्यक्तींनाही पोलिसांनी अटक केली.
२. त्रास देणार्या गुंड मवाल्याला विद्यार्थिनीकडून चोप
दुसरीकडे बिहारमधील गंज फारसगंज येथे एका शाळेत शिकणार्या मुलीला प्रतिदिन त्रास देत होता. एक दिवस त्याने तिचा हात पकडला. त्यानंतर तिने तेथेच त्याला चपलेने बदडले. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये तिचे पुष्कळ कौतुक झाले.
३. शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने जमावाने शाळा पेटवली !
पाटलीपुत्र शहरात ‘टाईनी टॉट ॲकॅडमी’ या शाळेत शिकणारा ४ वर्षांचा मुलगा शाळेतून घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे पालक त्याची चौकशी करण्यासाठी शाळेत पोचले. तेथील शिक्षक आणि कर्मचारी यांनी ‘मुलगा घरी गेला’, असे त्यांना सांगितले. त्यानंतर पालकांनी मुलाचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. तेव्हा त्यांना जवळच वहात असलेल्या नाल्यामध्ये त्यांच्या मुलाचे प्रेत दिसले. या घटनेमुळे संतप्त होऊन पालकासह जमावाने शाळा पेटवून दिली. तसेच रस्ता बंद आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांना बोलवावे लागले. या प्रकरणी पोलिसांनी शाळेमधील ३ व्यक्तींना कह्यात घेतले. विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला.
वरील घटना पाहिल्यावर ‘बिहार म्हणजे गुंडाराज’ हे पदोपदी जाणवते. त्यातही पोलिसांची वागणूक समाजाला कायदा हातात घेण्यास उद्युक्त् करते का ? हा प्रश्न निर्माण करणारी आहे. यामुळे सामान्य नागरिक त्याच्यावरील अन्यायाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला उत्सुक नसतो. कोणताच पर्याय शेष नसल्याने त्याला पोलीस ठाणे गाठावे लागते.
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२०.५.२०२४)