Ministry of External Affairs : परराष्ट्र मंत्रालयाने संमत केलेल्या मध्यस्थांवर (एजंटवर) विश्‍वास ठेवा !

कंबोडियात नोकरीसाठी जाणार्‍या भारतियांना भारत सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्रसारित

नवी देहली – कंबोडियातील भारतीय दूतावासाने कंबोडियात नोकरीसाठी जाणार्‍या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित केली आहे. नोकर्‍यांच्या संदर्भात फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असल्याने या सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत. यात म्हटले आहे की, केवळ भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने संमत केलेल्या मध्यस्थांवरच (एजंटवरच) विश्‍वास ठेवावा.

कंबोडियातील भारतीय दूतावासाने सांगितले की, नोकर्‍यांच्या शोधात असलेले लोकही यासंदर्भात आमच्याशी संपर्क साधू शकतात. परदेशात नोकरीच्या नावाखाली भारतीय नागरिकांशी फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. थायलंडमध्येही भारतीय नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. काही ‘डिजिटल सेल्स आणि मार्केटिंग’ नावाचे आस्थापन नोकर्‍या देण्याच्या नावाखाली भारतीय लोकांची फसवणूक करत आहे. अनेक आस्थापने थायलंड आणि लाओस या देशांमध्ये फसवणुकीच्या प्रकरणांत गुंतली आहेत. भारतीय नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून भ्रष्टाचार आणि सायबर गुन्ह्यांमध्ये फसवले जात आहे.