GITM 2024 :  पर्यटनस्थळाच्या मूळ संस्कृतीचा यथोचित सन्मान अन् प्रसार करणे आवश्यक !

‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’मध्ये पर्यटन क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे व्यक्तीमत्त्व जी.बी. श्रीधर यांचे वक्तव्य !

पणजी (गोवा), ४ एप्रिल (वार्ता.) : कोणतेही पर्यटनस्थळ महान बनवणे एकट्याचे काम नाही. हे कार्य सरकार, स्थानिक जनता आणि खासगी क्षेत्र यांचे सामूहिक दायित्व आहे. यासाठी पर्यटनस्थळाची मूळ संस्कृती, इतिहास, कला, वारसा आदींचा यथोचित सन्मान करत त्यांचा प्रसार करणे आवश्यक असते. कृत्रिम बुद्धीमत्ता यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजापर्यंत पोचायला हवे. यानेच पर्यटन क्षेत्राला परिणामकारकपणे चालना मिळू शकेल, असे वक्तव्य पर्यटन क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे व्यक्तीमत्त्व जी.बी. श्रीधर यांनी केले. श्रीधर हे ‘व्ही.एफ्.एस्. ग्लोबल’ आस्थापनाचे जागतिक पर्यटन प्रमुख असून सध्या दुबई येथे वास्तव्यास आहेत. ते गोवा राज्य पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’ या २ दिवसांच्या कार्यक्रमाच्या द्वितीय दिनी ४ एप्रिल या दिवशी बोलत होते. हा कार्यक्रम ताळगाव येथील ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम’मध्ये पार पडला.

कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात ‘पर्यटनाचे सादरीकरण (ब्रॅडिंग) आणि विपणन (मार्केटिंग)’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पीस थ्रू टूरिझम्’ संस्थेचे जागतिक अध्यक्ष अजय प्रकाश, जी.बी. श्रीधर, ‘चार्लसन ॲडवायझरी’ या पर्यटन संस्थेचे अध्यक्ष कार्ल वाझ, ‘विझा इंटरनॅशनल’चे युरोप खंडाचे प्रमुख हेनरी आणि ‘ट्रॅव्हल अँड टूरिझम् असोसिएशन ऑफ गोवा’चे उत्तर गोवा अध्यक्ष जॅक सुखीजा यांनी संबोधित केले. या वेळी गोव्यातील पर्यटनाला कशा प्रकारे वैविध्यपूर्ण आणि व्यापक करता येईल, यावर सर्वांनी त्यांचे विचार मांडले. मध्य अमेरिकी देश कोस्टा रिका येथील लोकांनी कशा प्रकारे त्यांची मूळ संस्कृती आणि चालीरिती यांना पर्यटनाच्या दृष्टीने चालना दिली, याविषयीचे बोलके उदाहरण हेनरी यांनी मांडले. कार्ल वाझ यांनी गोव्यातील ३३० गावे आणि १८९ ग्रामपंचायती येथील लोकांना पर्यटनाच्या विकासात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला. अजय प्रकाश यांनी म्हटले की, जागतिक ‘जीडीपी’च्या (सकल देशांतर्गत उत्पादनाच्या) १० टक्के भाग असणारे पर्यटन क्षेत्र कोणतेही उत्पादन करत नसले, तरी ‘आनंददायी स्मृती’ यांची निर्मिती करू शकते. जॅक सुखीजा यांनी या वेळी गोव्यातील अभयारण्य आणि ग्रामीण पर्यटन यांना चालना दिली जाण्यावरून भाष्य केले. पर्यटन जगतातील महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व असलेले मार्क मेंडिस यांनी या चर्चासत्राचे संचालन केले.

चर्चासत्रात उपस्थित विविध मान्यवर

दुपारच्या सत्रात पर्यटन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘डिजिटल नोमॅड’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. कोरोना काळापासून ‘डिजिटल नोमॅड’ ही संज्ञा प्रचलित झाली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम करणे) हा काम करण्याचा प्रकार चालू झाल्यामुळे लोक अल्प पैशात जीवन जगून नोकरी करण्यासाठी दुसर्‍या देशात रहाण्यावर भर देऊ लागले आहेत. जर ते क्षेत्र पर्यटनस्थळ असेल आणि तेथील सरकार आवश्यक सोयीसुविधा अशा लोकांना पुरवण्यास सक्षम असेल, तर ते तेथून त्यांच्या आस्थापनासाठी ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून काम करतात. अशा प्रकारे काम करणार्‍यांना ‘डिजिटल नोमॅड’ म्हटले जाते. या क्षेत्रात असलेल्या संधी, आव्हाने आदींवर या चर्चासत्रात विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.

पर्यटनाच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादास मिळते चालना ! – हेनरी, विजा इंटरनॅशनल

या वेळी ‘विजा इंटरनॅशनल’चे युरोप खंडाचे अध्यक्ष हेनरी यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी पर्यटनासाठी पनामा देशातील नागरिकांनी घेतलेल्या कष्टांवर चर्चा केली. हेनरी म्हणाले की, नागरिक जेव्हा त्यांच्या मूळ परंपरा, चालीरिती आणि संस्कृती यांना पर्यटनाच्या माध्यमातून जगासमोर ठेवतात, तेव्हा नागरिकांमधील सांस्कृतिक राष्ट्रवाद, तसेच प्रादेशिक अखंडत्वाची भावना वाढीस लागते.