गोव्याची राजधानी पणजीमध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या २ न्यायमूर्तींनी पणजीतील धूळप्रदूषणासंदर्भात स्वतः प्रत्यक्ष पहाणीही केली. त्यामुळे अशी कामे करतांना स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
१. शहरी विकासासाठी महत्त्वपूर्ण संसाधने
शहरांचा विकास करतांना मोठ्या प्रमाणात बांधकामे केली जातात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे उत्सर्जन होत असते. धुळीचे उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी ‘क्लिन कन्स्ट्रक्शन मॅन्युअल’ ही स्वच्छ बांधकाम करण्याविषयीची पुस्तिका मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करते. ‘डब्ल्यू.आर्.आय. इंडिया’ आणि स्थानिक प्राधिकरण यांच्या सहकार्याने सिद्ध करण्यात आलेल्या या पुस्तिकेत प्रत्यक्ष बांधकामाच्या वेळी करायच्या योग्य उपाययोजनांसंबंधी माहिती देण्यात आली आहे, जी अभियंते आणि कामगार यांना उपयुक्त ठरू शकते.
२. तांत्रिक क्षमता वाढवणे
‘सुरत क्लिन कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस’ आणि ‘क्लिन कन्स्ट्रक्शन मॅन्युअल’ यांद्वारे सिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक प्रकल्पांचा मुख्य उद्देश तांत्रिक क्षमता वाढवणे आणि बांधकामाच्या ठिकाणी धूळप्रदूषण अल्प करणे हे आहेत. नगरपालिका, पर्यावरण संस्था आणि उद्योग संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नांतून स्वच्छ बांधकाम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसमावेशक संसाधने विकसित करणे अन् त्याचे प्रशिक्षण आदी कार्यक्रम केले जातात.
३. तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता
पणजीसारख्या शहरांमध्ये धुळीच्या प्रदूषणाची अलीकडील उदाहरणे पहाता तेथे स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक ठरले आहे. जनहित याचिका आणि न्यायालयीन हस्तक्षेप यांमुळे सार्वजनिक आरोग्य अन् पर्यावरण यांचे रक्षण करण्यासाठी संबंधित अधिकार्यांकडून या प्रकरणी त्वरित कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे अधोरेखित होते. शाश्वत विकासासाठी नियमांची कठोर कार्यवाही आणि स्वच्छ बांधकाम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
४. स्वच्छ बांधकाम पद्धतींचे पालन केल्याने होणारे लाभ
बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छ बांधकाम पद्धत लागू केल्याने वातावरणातील धूळ न्यून करण्यासाठी लाभ होतो. या पद्धतींमध्ये ‘रिड्यूस’ म्हणजे न्यून (कमी) करणे, ‘रियुझ’ म्हणजे पुनर्वापर करणे आणि ‘रिसायकल’ म्हणजे सामुग्रीचा पुनर्वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे कचर्याचे प्रमाण न्यून होते.
नियमित स्वच्छता करणे, बांधकामांच्या ठिकाणी ‘बॅरियर’ (अडथळे) लावणे, यांसारख्या धूळ नियंत्रण उपायांना प्राधान्य देऊन बांधकामाचे ठिकाण स्वच्छ ठेवल्यास हवेतील धूळ न्यून करून हवेची गुणवत्ता सुधारते. त्यासह कचर्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर यांमुळे प्रदूषण न्यून होऊन पर्यावरणाचे रक्षण होते.
५. देशव्यापी उपक्रम
हे उपक्रम केवळ स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासह स्वच्छ बांधकाम पद्धतींचा देशभरात अवलंब करण्याच्या दृष्टीने आदर्श ठरू शकतात. नियमांचे पालन, प्रशिक्षण आणि ‘स्मार्ट सिटी’ची कामे करणारी संबंधित आस्थापने यांनी एकत्रितपणे धूळप्रदूषण रोखण्यासाठी अन् शहरी विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केल्यास देशपातळीवर कृतीत आणता येईल, असे एक चांगले उदाहरण निर्माण होऊ शकते.
६. स्वच्छ बांधकाम पद्धतींना प्राधान्य देणे हाच धूळप्रदूषण रोखण्याचा उपाय !
गोवा खंडपिठाच्या न्यायमूर्तींच्या पहाणीच्या वेळी नागरिकांशी न्यायमूर्तींनी जो संवाद साधला, त्या आधारे न्यायमूर्तींच्या नियोजित दौर्याच्या अवघ्या २ दिवस अगोदर धुळीचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पणजीमधील रस्त्यांवर पाणी फवारणी केली गेली. यावरून पणजी शहरात स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब केला जात नसल्याचे स्पष्ट होते, तसेच धुळीचे प्रदूषण निष्काळजीपणामुळे होत असल्याचे दिसून येते.
पणजीतील या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी केवळ धुळीच्या पातळीचे निरीक्षण करणे पुरेसे नाही, हे स्पष्ट आहे. संपूर्ण पणजीमध्ये स्वच्छ बांधकाम पद्धतींची काटेकोर कार्यवाही आणि पालन करण्याची आवश्यकता आहे. पणजीत आंतरराष्ट्रीय उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. त्यामुळे या शहरात स्वच्छता आणि पर्यावरण यांचे उच्च दर्जाचे पालन करणे, हे सर्वाेपरी आवश्यक आहे. स्वच्छ बांधकाम पद्धतींना प्राधान्य देऊन पणजीत धूळप्रदूषणाचा प्रभावीपणे सामना करू शकतो आणि तेथील रहिवासी अन् पर्यटक यांना आरोग्यदायी आणि शाश्वत शहरी वातावरण उपलब्ध करू शकतो.
– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (२.४.२०२४)