सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अनेक जन्मांचे देवाण-घेवाण हिशोब पूर्ण झाल्यावरच आध्यात्मिक प्रगती होते !

सौ. सविता प्रेमप्रकाश

सौ. सविता प्रेमप्रकाश : माझा मूळ स्वभावच असा आहे की, मला कोणतीही गोष्ट जलद हवी असते. ‘माझ्यामध्ये लवकर परिवर्तन व्हायला पाहिजे. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन त्वरित व्हायला पाहिजे’, असे मला वाटते आणि मी तसे प्रयत्नही करत आहे; परंतु आपण सांगितले होते, ‘साधना करायला लागल्यावर ५ – १० वर्षांनी साधकामध्ये पालट दिसून येतात.’ त्यावर माझ्या मनात विचार आला, ‘५ – १० वर्षे म्हणजे फारच मोठा कालावधी आहे, तर माझे आता कसे होणार ?’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आतापर्यंत आपले पुष्कळ जन्म झाले आहेत. प्रत्येक जन्मात आपण जे काही पाप-पुण्य केलेले असते, ते सर्व या एकाच जन्मात भोगणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे आपल्याला आणखी २ – ४ जन्म घ्यावेच लागतात. तेव्हा आपला सर्व देवाणघेवाण हिशोब संपतो. त्यानंतर आपण साधनेत पुढे जातो. समजले ना ?