सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी गोवा येथील श्री. शिवराज पाटील यांनी व्यक्त केलेले मनोगत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘परात्पर गुरुदेव, आपले असे भव्यदिव्य विराट दर्शन होणे, म्हणजे आमचे भाग्य आहे. जे आपणामुळे शक्य झाले, त्याबद्दल आपला ऋणी आहे. सत्संग आणि त्याचा परिणाम मी अनुभवल्यानंतर जीवनात पालट झाला. त्यानंतर माझे अखंड नाम चालू झाले आणि मला भावातीत होणे अनुभवता येऊ लागले. या उत्सवाचा प्रत्यक्ष सोहळा हा सहस्रो वर्षे तपश्चर्या करूनही प्राप्त होणार नाही.

श्री. शिवराज पाटील

२. मी शून्य आहे, स्वार्थाने भरलेला आहे. मला क्षमा करा, भगवंता. तुम्ही मला पुष्कळ दिलेत; पण मी तुम्हाला काहीच दिले नाही, तरीही तुम्ही इतकी कृपा केलीत.

३. या आयुष्यरूपी कुरुक्षेत्रावर विकारांच्या कौरवांसमवेत युद्ध करतांना गोंधळलेला मी अर्जुन आणि आपण समोर भगवंत.

४. आपण माझी चेतना आणि माझा विवेक जागवलात. ही पृथ्वी, हे घर, ही माणसे सारेच साधक अन् सारा आश्रम आहे. चराचरात आपण आहात. कोटी कोटी जीव आणि प्राणी, पक्षी, वृक्ष, लता-वेली, फुले, पंचमहाभूते, कोटी कोटी सूर्य-चंद्र आणि नक्षत्रे सारे आपणच आहात. हे शरीर आणि मन तुमचेच आहे. माझा चालू असलेला श्वासही तुमचाच आहे. सारे मन स्वाहा. आता नाम, नाम आणि नाम.

५. मी मला कवटाळून बसलो होतो आणि स्वार्थाने भरलो होतो. आता हलके वाटत आहे. सेवा करतांना ‘शरीर आणि मन स्थूल अन् सूक्ष्म यातून, तसेच आतून-बाहेरून कसे स्वच्छ करायचे ?’, हे शिकवलेत. श्रद्धा एक धागा आणि प्रीती, सेवा, सत्संग, नामसंकीर्तन, त्याग, परोपकार, भाव, निरपेक्षता, निरिच्छा, निस्वार्थ इत्यादी मणी या माळेत ओवता ओवता मोक्षमणी मिळून जाईल, हे शिकवलेत.

६. किती सोपे केलेत गुरुदेव, किती सोप केलेत. अवगुणांची लंका आणि अहंकाराचा रावण जाळलात अन् माझ्यासारख्या वानरास घेऊन नामाचा रामसेतू उभारून काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर जाळून आमच्या पाठीवर शाबासकी दिलीत.

७. भगवान श्रीकृष्णाने यशोदेला विश्वरूप दाखवले, तसेच दुर्याेधनालाही दाखवले. तेव्हा ‘हे कसे शक्य आहे ?’, असे मला वाटायचे. आता ब्रह्मोत्सवात पाहिले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन, संतांचे सान्निध्य आणि साधकांचे दर्शन हा नयनरम्य सोहळा म्हणजे सत्ययुगाची नांदी आहे.

धन्य धन्य तेची जन ।
जे सदा नामसंकीर्तनी परायण ।
तो कृपा करी कृष्णद्वैपायन ।
जयाचे दास कोटी सूर्यनारायण ।।

ही शब्दसुमने आपल्या चरणी समर्पित करून आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शिवराज पाटील, वेर्णा, गोवा. (२४.५.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.