Goa Sound Pollution : उत्तर गोव्यात समुद्रकिनार्‍यांवरील उपाहारगृहे आणि क्लब यांच्याकडून ध्वनीप्रदूषण चालूच !

गोव्यातील रात्रीच्या कर्णकर्कश संगीत पार्ट्या (प्रतिकात्मक चित्र)

पणजी, १ एप्रिल (वार्ता.) : उत्तर गोव्यातील कळंगुट, कांदोळी, हणजूण, वागातोर या समुद्रकिनार्‍यांवर उपाहारगृहे आणि क्लब यांच्याकडून सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत डेसीबल मर्यादेपेक्षा अधिक आवाजात संगीत वाजवले जात आहे. दहावीच्या परीक्षेला ३१ मार्चपासून प्रारंभ झाला असून या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांचा विचार करून हा आवाज मर्यादित राखण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्वासन दिले होेते; परंतु काही उपाहारगृहे आणि क्लब यांच्याकडून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत संगीत वाजवतांना आवाजाच्या डेसीबलची मर्यादा पाळली जात नाही अन् मर्यादेपेक्षा अधिक आवाजात संगीत वाजवले जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. सध्या रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यामुळे होणारा त्रास न्यून झाला आहे.

हणजूण येथील रहिवासी रवि हळर्णकर म्हणाले, ‘‘मोठ्या आवाजात संगीत वाजवणे न्यून झाल्यामुळे परिस्थिती चांगली आहे. काही क्लब आणि उपाहारगृहे यांना टाळे ठोकल्यामुळे हे झाले आहे, तरीही दिआझ, राईथ, हाऊस ऑफ चापोरा आणि रोमिओ लेन या आस्थापनांकडून ध्वनीप्रदूषण होत आहे.’’

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डेस्मंड डिकॉस्ता म्हणाले, ‘‘सध्या निवडणूक आचारसंहिता लागू केल्याने मोठ्या आवाजात संगीत वाजवण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. आमच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी पोलीसही सक्रीय झाले आहेत.’’ या सर्व उपाययोजना करूनही या भागात सायंकाळी मोठ्या आवाजात लावलेल्या संगीतामुळे त्रास होतो, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

न्यायालयाने आदेश देऊनही ध्वनीप्रदूषण करणारी अशी उपाहारगृहे आणि क्लब यांच्यावर उत्तरप्रदेश शासनाप्रमाणे कारवाई करून बुलडोझरद्वारे ती का पाडू नयेत ?