मोई (पुणे) गावाचा विकास करणारे माजी उपसरपंच गोरख गवारे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते ‘प्रभात आदर्श सरपंच पुरस्‍कारा’ने सन्‍मानित !

मोई (पुणे) गावाचा विकास करणारे माजी उपसरपंच गोरख गवारे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते ‘प्रभात आदर्श सरपंच पुरस्‍कारा’ने सन्‍मानित !

पुणे – राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या विचारांचा वारसा जपणार्‍या गावांमध्‍ये खेड तालुक्‍यातील मोई गावाचा समावेश होतो. माजी उपसरपंच गोरख गवारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने स्‍वयंस्‍फूर्तीने पुढाकार घेत विकासाची कामे वेगाने हाती घेतली. त्‍याला ग्रामस्‍थांनीही तेवढाच प्रतिसाद दिला. त्‍यामुळे जलसंधारण, शुद्ध पाणी, तंटामुक्‍ती, स्‍वच्‍छता, ग्राम सौंदर्यीकरण अशा विविध कामांमधून विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात येऊन गावाने आदर्श निर्माण केला आहे. त्‍यांच्‍या या कार्यासाठी त्‍यांना उच्‍च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा पुण्‍याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते ‘प्रभात आदर्श सरपंच पुरस्‍कार’ प्रदान करण्‍यात आला. सन्‍मानचिन्‍ह आणि मानपत्र असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप होते. येथील डी.पी. रस्‍त्‍यावरील शुभारंभ लॉन्‍स येथे नुकताच हा सोहळा पार पडला. हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याला गवारे नेहमी सहकार्य करतात. गावात समितीचे धर्मशिक्षणवर्ग असतील, तर त्‍यामध्‍ये त्‍यांचा सक्रीय सहभाग असतो.

सन्‍मानचिन्‍ह

गोरख गवारे यांनी केलेली लोकाभिमुख कामे

१. गोरख गवारे यांनी उपसरपंचपद २१ डिसेंबर २०२२ या दिवशी हाती घेतले आणि त्‍यांच्‍या कल्‍पकबुद्धीने ग्रामपंचायत प्रशासनाने लोकाभिमुख कामांसाठी पुढाकार घेतला. त्‍याला सरपंच, सदस्‍य, ग्रामस्‍थ यांच्‍या प्रयत्नांची मिळालेली जोड यातून हे मोई गाव विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आले आहे.

२. सुविधांच्‍या दिशेने गावात २ विहिरी, तसेच कूपनलिका (बोअरवेल) पाणीपुरवठ्यासाठी आहेत. नुकताच जलजीवन योजनेसाठी ५ कोटींचा निधी संमत झाला असून कामही चालू झाले आहे. या योजनेसाठी गोरख गवारे यांनी स्‍वत:ची २ गुंठे जागाही गावासाठी विनामूल्‍य उपलब्‍ध करून दिली आहे.

३. घरोघरी नळजोडणी देण्‍यासाठी सध्‍या काम चालू आहे. ग्रामपंचायत कार्यालयाला नवे रूप देण्‍यात आले असून गावाच्‍या विकासावर भर देण्‍यात आला. आज ती आदर्श इमारत म्‍हणून उभी राहिली आहे. जलसंधारणाच्‍या कामांवर भर दिला असून जलयुक्‍त शिवार अभियानातून गावात २ विहिरींचे काम चालू आहे.

४. पर्यावरणपूरक योजनेतील निधीचा वापर करत गावात १० सौर पथदिवे बसवण्‍यात आले आहेत. त्‍या माध्‍यमातून विजेचे देयक अल्‍प करण्‍याचा प्रयत्न झाला आहे.

५. ‘तंटामुक्‍त गावाचा आदर्श शांततेतून समृद्धीकडे’ जाण्‍याचा विचार ग्रामपंचायतीने मांडला. त्‍याअंतर्गत गावातील तंटे गावातच मिटवण्‍यावर भर दिला. आज या परिसरात माजी उपसरपंच गोरख गवारे आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्‍या प्रयत्नांनी एकोपा नांदत आहे. सामाजिक सौहार्द रहावे, यासाठी ‘एक गाव एक गणपति’ संकल्‍पनाही राबवण्‍यात आली आहे.

विकासकामे

ग्रामस्‍थांचे आरोग्‍य चांगले रहावे, याकरता गावपातळीवर नेत्र तपासणी, रक्‍तदान शिबिरे आणि अन्‍य आरोग्‍य शिबिरे घेण्‍यात आली. घंटागाडी असल्‍याने आता मोई कचराकुंडीमुक्‍त झाले आहे. महिला बचतगटाला रोजगाराचा पर्याय उपलब्‍ध करून दिला. स्‍वच्‍छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण गाव हागणदारीमुक्‍त झाले आहे. वर्ष २०२० मध्‍ये ग्रामपंचायत बिनविरोध केली. अंतर्गत रस्‍ते काँक्रिटीकरणासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्‍यांना शुद्ध पाणी मिळावे; म्‍हणून ग्रामपंचायतीच्‍या वतीने पाणी शुद्धीकरण यंत्र दिले. भैरवनाथ मंदिर, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मुक्‍ताई मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगी गोळा केली. भैरवनाथ, हनुमान मंदिरात ‘इन्‍व्‍हर्टर’ बसवले आहेत.