फोंडा आणि सांखळी येथे आज पालिका निवडणुकीसाठी मतदान


फोंडा, ४ मे (वार्ता.) –  आज फोंडा आणि सांखळी येथील नगरपालिकांची निवडणूक होणार असून मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी आहे. मतदानानंतर ७ मे २०२३ या दिवशी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाईल. या दोन्ही नगरपालिकांच्या कार्यकारी मंडळाची मुदत २० मे २०२३ या दिवशी संपणार आहे. फोंडा नगरपालिका मंडळामध्ये एकूण १६ सहस्र ३०५ मतदार असून यांपैकी ८ सहस्र १५२ पुरुष, तर ८ सहस्र १५३ महिला मतदार आहेत. सांखळी नगरपालिका मंडळामध्ये एकूण ८ सहस्र ६४० मतदार असून त्यांपैकी ४ सहस्र २३९ पुरुष आणि ४ सहस्र ४०१ महिला मतदार आहेत. फोंडा नगरपालिकेमध्ये १५ प्रभाग आहेत, तर सांखळी नगरपालिकेमध्ये १२ प्रभाग आहेत. खरे म्हणजे नगरपालिका निवडणूक पक्षीय स्तरावर लढवली जात नाही, तरीही राजकीय पक्ष उमेदवारांचे पॅनल सिद्ध करून ही निवडणूक लढवत आहेत.

सांखळी नगरपालिकेमध्ये सध्या काँग्रेसचा पाठिंबा असलेले पॅनल असून फोंडा नगरपालिकेमध्ये भाजप आणि मगोप हे दोन्ही पक्ष त्यांचा गट ठेवण्याची शक्यता आहे. फोंडा नगरपालिकेमध्ये भाजपप्रणित ४ उमेदवारांपैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकार्‍यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तसेच फोंडा आणि डिचोली तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांकडून मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके नियुक्त  करण्यात आली आहेत.