जळगाव येथे बसस्‍थानक आणि विभागीय कार्यालय यांची पुनर्बांधणी होणार !

एकूण ३२ कोटींचा सुधारित प्रस्‍ताव !

जळगाव बसस्‍थानक आणि विभागीय कार्यालय यांची पुनर्बांधणी केली जाणार

जळगाव – जळगाव बसस्‍थानक आणि विभागीय कार्यालय यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे, तसेच आगार आणि विभागीय कार्यशाळेचे नूतनीकरण अन् काँक्रिटीकरणही केले जाणार आहे.यात जळगाव मध्‍यवर्ती बसस्‍थानक आणि विभागीय कार्यालय यांच्‍या पुनर्बांधणीसाठी १८ कोटी रुपये, जळगाव आगार नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण यांसाठी ६ कोटी, तर विभागीय कार्यशाळा नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण यांसाठी ८ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्‍ताव प्रशासकीय संमतीसाठी मुंबईतील कार्यालयाकडे पाठवला आहे.

इलेक्‍ट्रिक बस ( संग्रहीत छायाचित्र )

जळगाव विभागात ‘एस्.टी.’च्‍या ताफ्‍यात २२१ इलेक्‍ट्रिक बस येतील, तर इतर १० साध्‍या गाड्याही येत आहेत. त्‍यातच महिला सन्‍मान योजना, ज्‍येष्‍ठ  नागरिक तिकीट सवलत यांसह विविध योजनांमुळे ‘एस्.टी.’च्‍या प्रवासी संख्‍येत दिवसेंदिवस वाढ होत असल्‍याने जळगाव बसस्‍थानकाची जागा अपुरी पडत आहे. त्‍यामुळे मध्‍यवर्ती बसस्‍थानकासह विभागीय कार्यालयाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. हे आदेश आल्‍यानंतर विभागीय कार्यालय उपाहारगृहाच्‍या जागेत हलवले जाईल. विभागीय कार्यशाळेच्‍या नूतनीकरणासह काँक्रिटीकरण केले जाणार आहे.

भुसावळ, अडावद, मुक्‍ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा, यावल, पारोळा, फैजपूर, रावेर, एरंडोल आणि पातोंडा येथे बसस्‍थानकांमध्‍ये सुधारणा अन् काँक्रिटीकरण होणार आहे. यांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्‍यात आली आहे.

जिल्‍ह्यातील बसस्‍थानक, आगार आणि वाहनतळ कामांचा सुधारित प्रस्‍ताव प्रशासकीय संमतीसाठी मुंबई कार्यालयाकडे पाठवला आहे. संमती मिळाल्‍यानंतर प्रत्‍यक्ष कामांना प्रारंभ होईल. यात बसस्‍थानक, आगार आणि वाहनतळ अशा कोणत्‍या कामाला संमती मिळाली आहे. त्‍यानुसार कामाला प्रारंभ होईल. – भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव