संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान !

इंद्रायणी काठ वारकर्‍यांनी गजबजला !

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी

आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे २१ जून या दिवशी सायंकाळी ४ वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून किमान ४ लाखांहून अधिक वारकरी आळंदीत जमले होते. त्यामुळे इंद्रायणी काठ वारकर्‍यांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता. संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान आणि प्रशासनाच्या वतीने पायी वारी प्रस्थान सोहळ्याची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे.

२१ जूनला पहाटे ४ वाजता घंटानाद, काकड आरती आणि अभिषेक करण्यात आला.  सकाळी ९ ते ११ या वेळेत वीणा मंडपामध्ये कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर गुरु हैबतबाबा आणि संस्थान यांच्या वतीने माऊलींची आरती करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मानकर्‍यांना नारळ प्रसादवाटप करून मंडपात माऊलींच्या पादुका आणण्यात आल्या. त्यानंतर दुपारी ४ वाजता नियमित प्रथा परंपरेनुसार माऊलींच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. तुकाराम महाराज, तसेच ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत असल्याने पालख्या  आणि वारकरी यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.