VIDEO : आदर्श चरित्र निर्माण करणारे शिक्षण आवश्यक ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘हिंदूंची शिक्षण प्रणाली’ या विषयावर विचारमंथन

पू. (डॉ.) शिवनारायण सेन

रामनाथी, १६ जून (वार्ता.) – पूर्वीच्या काळी भारतात शाळा मंदिरांमध्येच चालवल्या जात असत. साधारणतः प्रत्येक गावात एक मंदिर होते आणि प्रत्येक गावात एक शाळा होती. एक इंग्रज अधिकारी थॉमस मुन्रो यांच्या अहवालानुसार वर्ष १८२६ मध्ये दक्षिण भारतात १ लाख २८ सहस्र शाळा होत्या. ज्यांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्के होते, तर शुद्र विद्यार्थ्यांचे प्रमाण ६५ टक्के इतके होते. प्रत्येक १ सहस्र लोकांमागे १ शाळा होती. मंदिरांतून शाळांप्रमाणे संपूर्ण गावही चालवले जात असे. पुढे हे सर्व इंग्रजांनी बंद केले. आजही भारतात कोणत्याही शाळेत धार्मिक शिक्षण दिले जात नाही. भारत हिंदु राष्ट्र घोषित झाल्याविना हिंदूंना धर्माचे शिक्षण देता येणार नाही. त्यामुळे ‘सर्व संस्थांनी एकत्रित येऊन आदर्श चरित्र निर्माण होईल’, असे धार्मिक शिक्षण देणे आवश्यक आहे. सध्या किमान प्राथमिक शाळांत तरी धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी एक समिती स्थापन झाली पाहिजे, असे आवाहन बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी केले. ते दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १६ जून २०२२ या दिवशी ‘हिंदूंची शिक्षण प्रणाली’ या विषयावर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील संशोधन विभागाचे श्री. शॉन क्लार्क, स्वामी संयुक्तानंद महाराज, बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. (डॉ.) शिबनारायण सेन, मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथील सप्तर्षी गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. देवकरण शर्मा उपस्थित होते.

या वेळी अन्य वक्त्यांनी केलेले ओजस्वी मार्गदर्शन

१. हिंदूंनो, संकल्पशक्तीचे महत्त्व जाणून धर्मकार्य करण्याचा संकल्प करा ! – टी.एन.मुरारी, भाजप नेता, तेलंगाना, 

श्री. टी.एन्.मुरारी

हिंदूंनी पुढे येऊ घातलेल्या आपत्काळासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. हिंदूंनी धर्मावर निष्ठा ठेवून हिंदुत्वाचे काम करत राहिले पाहिजे. हिंदु संघटनांनी घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी आहे. देशातील हिंदूंच्या समस्या सोडवण्याचे दायित्व तुमच्यावर आहे. हिंदूंनो, संकल्पशक्तीचे महत्त्व जाणून धर्मकार्य करण्याचा संकल्प करा. तुम्ही संकल्प केलात, तर तो पूर्ण करण्यासाठी ईश्वरही येतोच. हिंदूंनी संघटित होऊन (वैध मार्गाने) लढा द्यायचा आहे. आपल्याला ईश्वर आणि गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचा आशीर्वाद आहे.

हिंदु राष्ट्र अधिवेशन हे ऊर्जाकेंद्र ! – टी.एन.मुरारी, भाजप नेता, तेलंगाना,

सध्या चालू असलेले हे अधिवेशन मनोबल पुरवणारे ऊर्जाकेंद्र आहे. येथील ऊर्जेमुळे पुढे वर्षभर कार्य करण्यासाठी मनोबल मिळते.

श्री. टी.एन्. मुरारी यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

मनोगताच्या आरंभी श्री. टी.एन्. मुरारी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे (प्रेरणास्रोत) गुरुजी (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) हे आपला सर्वांचा हात पकडून आध्यात्मिक स्तरावर जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत, त्याविषयी त्यांना प्रणाम करतो. हात पकडून पुढे घेऊन जाणार्‍यांची आवश्यकता असते. त्यामुळे कार्य चांगले होते.’’

२. जगातील वारसास्थळांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून पुनर्विचार व्हावा ! – श्री. शॉन क्लार्क, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

श्री. शॉन क्लार्क

हिंदु धर्माचे महत्त्व जाणण्यासाठी आध्यात्मिक संशोधनकार्याची प्रत्येक हिंदूला माहिती असायला हवी. ‘बाह्यतः चांगली दिसणारी वस्तू, वास्तू किंवा गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने पवित्र असते’, असे नाही, हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने केलेल्या संशोधनांतून सिद्ध झाले आहे. यासंदर्भातील संशोधनातील प्रयोगात जगातील ७ आश्चर्ये म्हणून ओळखल्या जाणार्‍या वारसास्थळांची निरीक्षणे घेण्यात आली. त्यात ‘या सातही वास्तू मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करतात’, असे दिसून आले. अधिकतर वारसास्थळांच्या ठिकाणी थडगे आहेत. याउलट भारतातील प्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी मंदिराचे रिडिंग घेण्यात आल्यावर त्यात थोडीही नकारात्मक ऊर्जा न आढळता केवळ सकारात्मक ऊर्जा आढळली; परंतु दुर्दैवाने श्री तिरुपती बालाजी मंदिर हे जागतिक वारसास्थळ नाही. यावरून ‘जगातील वारसास्थळांचा आध्यात्मिकदृष्ट्या पुनर्विचार केला गेला पाहिजे’, हे लक्षात येते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे हिंदु संस्कृतीचे महत्त्व सिद्ध करणारे संशोधनकार्य’ या विषयावर ते बोलत होते.

या वेळी श्री. क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने वैज्ञानिक उपकरणांद्वारे हिंदु धर्मातील कृतींचे संशोधनात्मक प्रयोगांचे निष्कर्ष सांगून त्यांचे महत्त्व पटवून दिले. यात जगभरातील पाण्याच्या १ सहस्र नमुन्यांची चाचणी, विविध प्रकारे काढले जाणारे स्वस्तिक, साधना करणारे आणि न करणारे यांच्या घरांतील स्पंदने, विविध प्रकारच्या लेखकांनी लिहिलेली आध्यात्मिक पुस्तकांची निरीक्षणे, संगणकीय अक्षरांचा फॉन्ट आणि नामजप केल्यावर कुंडलिनीचक्रांवर होणारा परिणाम आदी प्रयोगांची माहिती दिली.

क्षणचित्रे :

१. या वेळी श्री. क्लार्क यांनी उपस्थितांकडून स्पंदनांच्या संदर्भात एक प्रयोगही करवून घेतला. यात चिनी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांतून उच्चारलेले ‘सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो’, हे वाक्य ऐकवण्यात आले. या प्रयोगाद्वारे उपस्थितांना संस्कृत भाषेचे महत्त्व लक्षात आले.

२. ताजमहाल आणि त्याच्या जवळून वाहणारी यमुना नदी यांचे सूक्ष्मचित्र उपस्थितांना दाखवण्यात आले. ‘वरवर प्रदूषित दिसणार्‍या यमुना नदीतून चैतन्य प्रक्षेपित होते’, हे पाहून उपस्थित सर्व जण प्रभावित झाले.

३. देशातील हिंदूंचे संरक्षण करणे महत्त्वाचे ! – स्वामी संयुक्तानंद महाराज, भारत सेवाश्रम संघ

स्वामी संयुक्तानंद महाराज

भारत हा शांतीप्रिय देश असला, तर प्रत्येक संतांनी त्यांचे कर्तव्य बजावले पाहिजे. संत विश्वाच्या कल्याणासाठी झगडत असतात. ‘हिंदूंच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची संख्या घटली’, असे व्हायला नको. त्यामुळे प्रथम देशातील हिंदूंचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. देशातील बुद्धीजिवी आणि सामान्य जनता मोहनदास गांधी यांनी सांगितलेल्या ‘अहिंसा परमो धर्म’ या आधारे जीवन व्यतित करत आहे. त्यामुळे आजही धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार होत आहेत. गांधी हे बलवान नव्हते; मात्र हिंदू त्यांच्या मागे गेल्याने हिदूंची हानी झाली. अशी हानी न होण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. तसा आपण संकल्प केला पाहिजे, कारण संकल्पाविना आपण काही करू शकत नाही. झोपलेल्या माणसाच्या हाती शस्त्र दिले, तर ते काम करू शकणार नाही. त्यामुळे अशा लोकांना जागृत करायला हवे. कार्य केल्यानंतर फळाची अपेक्षा करायला नको. फळ नंतर मिळणारच आहे.

क्षणचित्र

अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात गौतम बोस यांनी सिद्ध केलेली ‘बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार’ या संदर्भातील ध्वनीचित्र चकती दाखवण्यात आली.