‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच युवकांचे ‘करिअर’ असायला हवे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हर्षद खानविलकर

सद्य:स्थितीत युवक-युवती स्वत:च्या ‘करिअर’च्या (भवितव्याच्या) मागे लागले आहेत; परंतु आज राष्ट्राचे ‘करिअर’ धोक्यात आहे. राष्ट्राचे ‘करिअर’ धोक्यात असेल, तर आपले ‘करिअर’ कसे घडेल ? छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बालवयात राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी जीवन समर्पित केले. त्यांना स्वत:चे ‘करिअर’ नव्हते का ? त्यांचा आदर्श घेऊन ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच युवकांचे ‘करिअर’ असायला हवे. धर्मकार्यामध्ये योगदान देणारे युवक निर्माण व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्रवीर’ निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. हिंदूंना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे हिंदूंची दु:स्थिती झाली आहे. हिंदु जनजगाती समितीच्या वतीने युवक-युवती यांना विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण देण्यात येत आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथे ९५ स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात येत आहेत. याचा लाभ ४०० हून अधिक युवक-युवती घेत आहेत. शौर्याला शक्तीचे बळ मिळावे, यासाठी समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘बलोपासना सप्ताह’ आयोजित करण्यात आले. यामध्ये बलोपासनेसह श्रीराम, हनुमान यांचे नामस्मरण करण्यात आले. यामध्ये ५८० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले होते. काळानुसार घराघरांत हिंदु राष्ट्राचा विचार पोचवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी दिली. ‘शौर्य जागरण उपक्रमाच्या माध्यमातून युवकांचे संघटन होण्यासाठीचे प्रयत्न’ या विषयावर ते बोलत होते.