रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर !

  • युक्रेनवरील आक्रमण चालूच !

  • कीववर कोणत्याही क्षणी रशियाचे नियंत्रण !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेेलेंस्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर पुतिन

कीव (युक्रेन) – रशियाने २४ फेब्रुवारीपासून युक्रेनविरुद्ध चालू केलेली सैन्य कारवाई, ही ‘युद्ध’ असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी २५ फेब्रुवारी या दिवशी केली. रशियाच्या सैन्याकडून युक्रेनच्या जवळपास सर्वच शहरांना लक्ष्य करण्यात येत आहे. रशियाचे सैन्य बेलारूसच्या सीमेवरून युक्रेनमध्ये घुसले असून युक्रेनची राजधानी कीवपासून केवळ अवघ्या १० कि.मी. अंतर दूर आहे. कोणत्याही क्षणी राजधानी कीव रशियाच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता आहे.

 (सौजन्य : Republic World)

रशियाने भूमीवरून, सागरी मार्गाने आणि आकाश मार्गाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशियाचे तब्बल १ लाख सैन्य युक्रेनमध्ये घुसले आहे. रशियाच्या सैन्याने यापूर्वीच युक्रेनमधील कुप्रसिद्ध चेर्नोबिल हा अणुप्रकल्प नियंत्रणात घेतला आहे. सोव्हिएत संघ असतांना येथे झालेल्या वायूगळतीमुळे सहस्रो लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या हा प्रकल्प बंदच आहे. रशियाकडून युक्रेनच्या शहरांमध्ये क्षेपणास्त्रे आणि तोफगोळे यांचा वर्षाव करण्यात येत आहे, तसेच नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. रशियाच्या आक्रमणात आतापर्यंत युक्रेनचे १३७ जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. काही इमारतींची मोठी हानी झाल्याचेही दिसून आले आहे. या आक्रमणांमुळे कालपासूनच नागरिकांनी बंकरमध्ये, तसेच भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे.

युक्रेनने शस्त्रे खाली ठेवल्यास चर्चेस सिद्ध ! – रशिया

मॉस्को – युक्रेनवर चालू असलेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सरगेई लावरोव यांनी ‘युक्रेनने शस्त्रे खाली ठेवल्यास आम्ही चर्चेस सिद्ध आहोत. नाझीवाद्यांनी युक्रेनवर राज्य करावे, अशी आमची इच्छा नाही’, असे वक्तव्य यांनी केले.

रशियाने युक्रेनच्या सरकारला ‘नाझीवादी’ म्हटल्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेेलेंस्की यांनी ‘मी तर ज्यू आहे. मी नाझी कसा असू शकेन ?’, असा प्रतिप्रश्‍न रशियाला केला आहे.