व्यष्टी साधनेत सातत्य ठेवून कोणतीही परिस्थिती स्वीकारणार्‍या सावर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथील सौ. वनिता शिवराम बांद्रे !

 श्री. शिवराम बांद्रे यांना त्यांची पत्नी सौ. वनिता बांद्रे यांच्या समवेत सेवा करतांना त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सौ. वनिता शिवराम बांद्रे

१. ‘सौ. वनिता प.पू. वनगे महाराज यांची शिष्या असून ती सनातन संस्थेत येण्यापूर्वी नेहमी ‘आमचे महाराज’, असे म्हणायची; पण आता ‘महाराज आणि सनातन संस्था यांचे कार्य एकच आहे’, असे म्हणते.

२. पत्नीत जाणवलेला पालट

पूर्वी तिचा स्वभाव चिडचिडा असून ती मोठ्या आवाजात बोलत असे. आता तिचा चिडचिडेपणा न्यून होऊन ती हळू आणि शांतपणे बोलते.

३. व्यष्टी साधनेत सातत्य

व्यष्टी साधनेमध्ये तिचे सातत्य असते. नामजपादी उपाय करणे ती कधीही चुकवत नाही.

४. माझ्या चुका सांगून ती मलाही नेहमी साधनेत साहाय्य करते.

श्री. शिवराम बांद्रे

५. परिस्थिती स्वीकारणे

आमचा कष्टाचा व्यवसाय असून कौटुंबिक परिस्थिती चांगली नसतांनाही ती काटकसरीने संसार चालवते. व्यवसाय आणि कुटुंबाचा भार सांभाळून मला सतत सेवेला बाहेर पाठवून मला साधनेत साहाय्य करते.

६. परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा

आम्हाला आयुष्यात अनेक अडचणी, अपघात, तसेच समाजाच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. त्याही परिस्थितीत गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून अडचणींवर मात करून तिने मला क्षणोक्षणी साहाय्य केले.

७. प.पू. गुरुदेवांना पाहिले नसतांनाही त्यांनी स्वप्नात येऊन दर्शन देणे

एकदा रात्री स्वप्नामध्ये वनिताला पुढील दृश्य दिसले – ‘ती सावर्डे बसस्थानकाजवळ उभी आहे. प.पू. गुरुदेव आणि अनेक साधक एका मोठ्या वाहनातून महामार्गावरून घोषणा देत जात आहेत. तेव्हा प.पू. गुरुदेव हात उंचावून सर्वांना आशीर्वाद देत आहेत.’ परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना तिने पूर्वी कधी पाहिले नव्हते. स्वप्नात तिला त्यांचे दर्शन झाले. रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर सावर्डे येथे वाहनातून प्रवास करतांना हेच दिसले होते, हे लक्षात आल्यावर तिच्या डोळ्यांतून अश्रू वहात होते.

‘हे गुरुदेवा, पत्नीमध्ये झालेले पालट आणि गुणवैशिष्ट्ये माझ्याकडून लिहून घेतलीत, यासाठी आपल्या चरणी अनन्यभावाने शरण येऊन कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शिवराम बांद्रे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. (१७.११.२०१९)