वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य !‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, या विचाराने त्यांच्या मुलांना साधना करण्यास विरोध करतात; परंतु ते लक्षात घेत नाहीत की, हे नातेवाईक केवळ याच जन्मातील आहेत. पालकांनी ‘जन्मोजन्मींचे नाते असणार्या देवाला काय अपेक्षित आहे?’, याचा प्रथम विचार केला पाहिजे आणि मुलांना साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य केले पाहिजे. ती त्यांची साधनाही होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१) |
६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा रामनाथी, गोवा येथील दैवी बालक कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (वय १० वर्षे) याचा संतांप्रतीचा कृतज्ञताभाव !
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन म्हणजे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन’, असा भाव असलेला कु. श्रीनिवास !
‘२४.१०.२०२१ या दिवशी बालसाधक आणि त्यांचे पालक यांच्यासाठी सत्संग आयोजित केला होता. सत्संगापूर्वी मी श्रीनिवासला विचारले, ‘‘आजच्या सत्संगाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्यास तुला काय वाटेल ?’’ तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘मला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होईल.’’
२. एका संतांच्या सत्संगाला जायचे असल्याचे कळल्यावर लगेचच श्रीनिवासने कृतज्ञता व्यक्त करणे
रामनाथी आश्रमात आल्यावर श्रीनिवासची एका सत्संगात एका संतांशी भेट झाली. त्यांनी त्याला बालसाधकांच्या समवेत प्रतिदिन सत्संगाला यायला सांगितले. २ – ३ दिवस सत्संगाला गेल्यावर काही दिवस श्रीनिवासला सत्संगाला उपस्थित रहाता आले नाही. त्यानंतर काही दिवसांनी मी त्याला ‘आज तुला सत्संगाला जायचे आहे’, असे सांगितल्यावर त्याने लगेचच कृतज्ञता व्यक्त केली.
३. श्रीनिवासचा भाव आणि सेवा यांमुळे प.पू. दास महाराज यांनी श्रीनिवासविषयी ‘माझा शिष्य का आला नाही ?’, असे विचारणे
एकदा श्रीनिवासची प.पू. दास महाराज यांच्याशी भेट झाली. श्रीनिवास काही दिवस प.पू. दास महाराज यांच्याकडे सेवेसाठी जात होता. तेव्हा प.पू. दास महाराज यांना त्याचा संतांप्रतीचा भाव पुष्कळ आवडला. एकदा त्याच्याकडून चूक झाल्यामुळे आम्ही त्याला सांगितले, ‘‘प.पू. दास महाराज यांच्याकडे तू विचारूनच जायचेस.’’ त्यामुळे तो ३ – ४ दिवस प.पू. दास महाराज यांना भेटला नाही. तेव्हा प.पू. महाराज यांनी त्याची पुष्कळ आठवण काढली. प.पू. दास महाराज यांनी त्यांच्या सेवेतील एका साधकाला श्रीनिवासविषयी विचारले, ‘‘२ – ३ दिवस माझा शिष्य आला नाही. कुठे गेला ?’’
– श्री. धैवत वाघमारे (श्रीनिवासचा मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२१)
वडिलांचे निधन झाल्यावर स्थिर राहून त्यांचे धर्मशास्त्रानुसार अंत्यसंस्कार करणारा कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे !
२०.५.२०२१ या दिवशी श्रीनिवासच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या वेळी भ्रमणभाषवरून त्याच्याशी बोलतांना त्याने काही सूत्रे सांगितली. त्या वेळी श्रीनिवासची जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. वडिलांचे निधन झाल्यानंतर नामजप आणि प्रार्थना केल्यानंतर श्रीनिवास शांत होणे : ‘वडिलांचे निधन झाल्यानंतर आरंभी श्रीनिवासला काही वेळ पुष्कळ रडू आले. नंतर त्याचे माझ्याशी (श्री. धैवत वाघमारे यांच्याशी) भ्रमणभाषवरून बोलणे झाले. मी सांगितलेला नामजप आणि प्रार्थना केल्यानंतर तो पुष्कळ शांत झाला.
२. वडिलांवर धर्मशास्त्रानुसार अंत्यसंस्कार करतांना श्रीनिवासची झालेली विचारप्रक्रिया : श्रीनिवासच्या मुंजीच्या वेळी चौलकर्म करतांना (डोक्यावरील केस काढतांना) तो बराच रडला होता; मात्र वडिलांवर अंत्यसंस्काराच्या वेळी वपन करतांना (डोक्यावरील केस काढतांना) तो रडला नाही. तो म्हणाला, ‘‘मला माझ्या बाबांचे सगळे व्यवस्थित करायचे होते. त्यामुळे मी रडलो नाही. सगळे शांतपणे केले.’’
– श्रीमती मेघना वाघमारे (आजी) आणि श्री. धैवत वाघमारे (मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२१)
रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मंदिराजवळ खेळत असतांना ‘कुणीतरी समवेत आहे’, असे वाटणे आणि नंतर देवीचे दर्शन घेतांना सूक्ष्मातून देवी दिसणे
‘११.१०.२०२१ या दिवशी मी, कु. नंदन कुदरवळ्ळी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ९ वर्षे) आणि कु. जयंत मल्ल्या (आध्यात्मिक पातळी ५० टक्के, वय ९ वर्षे) या माझ्या मित्रांच्या समवेत रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मंदिराजवळ खेळत होतो. तेव्हा ‘आमच्या समवेत आम्हा तिघांच्या व्यतिरिक्त चौथे कुणीतरी आहे’, असे मला वाटत होते. खेळून झाल्यानंतर मी देवीचे दर्शन घेतले. तेव्हा मला सूक्ष्मातून हातात शस्त्र धारण केलेली देवी दिसली. मी तिच्या चरणी नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.’
– कु. श्रीनिवास देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०२१)