प.पू. दास महाराज यांच्याविषयी अपार भाव असलेले त्यांचे भक्त श्री. रमाकांत नेवाळकर !

प.पू. दास महाराज

‘मी (श्री. रमाकांत नेवाळकर) लहानपणापासून देवाची सेवा करतो. मला प.पू. दास महाराज यांचे (प.पू. बाबांचे) पायात खडावा घातलेले आणि त्यांची आई पू. रुक्मिणी भगवानदास नाईक यांचे दर्शन होते. प.पू. दास महाराज यांची आई कपडे धुवायची तो दगड बांदा येथे आहे. आता प.पू. बाबांनी बांदा येथे राममंदिर बांधले आहे. तिथे पुष्कळ लोक दर्शनासाठी येतात.

१. स्वप्नात विश्रामालय (रेस्टारेंट) बांधण्याच्या जागेवर श्रीलक्ष्मी-नारायण यांच्या मूर्ती असल्याचा दृष्टांत होणे, तेथे खणून पाहिल्यावर मूर्ती मिळणे, तेव्हा ‘तेथे आधी मंदिर बांधून नंतर विश्रामालय बांधायचे’, असे ठरवणे : मी प.पू. बाबांकडे विश्रामालयासाठी (हॉटेलसाठी) जागा मागितल्यावर त्यांनी मला जागा उपलब्ध करून दिली. मला झोपेत ‘त्या जागेत ‘श्रीलक्ष्मी-नारायण’ यांच्या मूर्ती आहेत’, असा दृष्टांत झाला; म्हणून मी त्या ठिकाणी खोदले. तेव्हा मला त्या ठिकाणी श्रीलक्ष्मी-नारायण यांच्या मूर्ती मिळाल्या. मी श्रीलक्ष्मी-नारायण यांच्या मूर्तींना सांगितले, ‘मी प्रथम तुमच्यासाठी मंदिर बांधतो आणि नंतर माझे घर अन् विश्रामालय बांधतो.’ त्याप्रमाणे मी केले.

२. प.पू. दास महाराज रुग्णाईत असतांना त्यांची रात्रभर सेवा करणे : एकदा प.पू. बाबांना ताप आला होता. तेव्हा प.पू. बाबा ‘आता मी मरणार. माझा मृत्यू होणार’, असे म्हणत होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘काही काळजी करू नका. भगवंत आपल्या समवेत आहे.’’ त्या वेळी मी रात्रभर त्यांची सेवा केली.

३. प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या सोहळ्यासाठी स्वतःच्या घरातील कार्यक्रम रहित करून या सोहळ्यासाठी सभागृह आणि त्यांचे नातेवाईक अन् भक्त यांच्यासाठी विश्रामालयाच्या खोल्या उपलब्ध करून देणे : आमच्या घरी काही कार्यक्रम असल्यामुळे आमच्या विश्रामालयामध्ये आमचे १५ नातेवाईक रहायला येणार होते; पण २०.१२.२०२१ या दिवशी प.पू. बाबांचा ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळा असल्यामुळे आम्ही हा पूर्वनियोजित कार्यक्रम रहित केला. आम्ही प.पू. बाबांच्या कार्यक्रमासाठी सभागृह आणि त्यांचे नातेवाईक अन् भक्त यांच्यासाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या.’

– श्री. रमाकांत नेवाळकर, बांदा, पानवळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक