आर्थिक अडचणींमुळे राज्यातील जलसंधारणाच्या कामांना फटका !

सरकारकडून केवळ दुरुस्तीच्या कामांना संमती

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात जलसंधारणाच्या अंतर्गत ९५ सहस्र दुरुस्तीची कामे आहेत; मात्र कोरोनामुळे झालेल्या आर्थिक अडचणीमुळे मागील २ वर्षे ही कामे रखडली आहेत. आर्थिक अडचणींमुळे ९५ सहस्र कामांपैकी केवळ ७ सहस्र ९१६ दुरुस्तीच्या कामांना सरकारने अनुमती दिली आहे. वर्ष २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण करावयाची असून आर्थिक अडचणीमुळे कोणतेही नवीन काम हाती घेण्यात आलेले नाही, अशी माहिती एका अधिकार्‍यांनी दिली.

कोरोनाच्या संकटामुळे मागील २ वर्षे राज्यांतील जलसंधारणाची कामे रखडली आहेत. ही रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सरकारने १ सहस्र ३४० कोटी रुपये संमत केले आहेत. कोरोनामुळे एकूण आर्थिक तरतुदीतील ४० टक्के रक्कम न्यून करण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. यामुळे एकूण निधीतील ४० टक्के निधी वजा करून निधी उपलब्ध होणार आहे. एकूण निधीतील ४०० कोटी रुपये जलसंधारण विभागाला प्राप्त झाले आहेत. यातून राज्यातील पाझर तलाव, साठवणुकीचे तलाव आदींच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.