१ लाख रुपयांची लाच घेणारा नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी अटकेत !

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या संगणकीय प्रणालीत फेरफार करून स्थानिक संस्था कराच्या (एल्बीटीच्या) दंडाची रक्कम निरंक दाखवण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेणार्‍या महापालिकेच्या कंत्राटी कर्मचार्‍याला नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. विनायक पाटील असे या आरोपीचे नाव असून ते कोपरखैरणे येथील कार्यालयात कार्यरत आहेत. सत्र न्यायालयाने आरोपीला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

येथील एका खासगी आस्थापनाने वर्ष २०१३ ते २०१६ या कालावधीत आलेला ‘सेस’ कर वेळेत भरला नाही. त्यामुळे आस्थापनाला मूळ रकमेवर दंड आणि व्याज आकारण्यात आला होता. ही रक्कम कार्यालयीन संगणकामध्ये निरंक दाखवण्यासाठी विनायक पाटील यांनी ३ लाख रुपयांची लाच मागितली. प्राप्त तक्रारीनंतर पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना पोलिसांनी विनायक पाटील यांना अटक केली.