मुंबईत पाणी भरणार नाही, असा दावा कधीच केला नव्हता !  किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

किशोरी पेडणेकर

मुंबई – समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस चालू यांमुळे पाणी भरणारच. पुणे येथेही पाणी तुंबले आहे. आताही काही भागांमध्ये पाणी साचलेले नाही. पाण्याचा निचरा झालेला आहे. ४ घंट्यांत पाण्याचा निचरा झाला नाही, तर आरोप योग्य आहे; पण ‘मुंबईत पाणी भरणार नाही’, असे मी कधीच म्हणाले नाही, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

या वेळी सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘पूर्वी पावसामुळे ४-५ दिवस मुंबई ठप्प व्हायची; पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही मुंबईतील सर्व भागांवर लक्ष ठेवून आहोत. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल, तेथे त्वरित कारवाई करत आहोत. मागील वर्षीपासून मनुष्यबळ विस्कळीत झाले आहे; मात्र हे कारण आम्ही देणार नाही. मुंबईत ४ घंट्यांहून अधिक काळ पाणी साचणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.’’

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना म्हणाले, ‘‘मुंबईत एका घंट्यांत ६० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. शीव आणि चुनाभट्टी रेल्वेमार्गावर पाणी असून अन्य ठिकाणी पाणी आले नाही. महापालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनामुळे मागील १० वर्षांमध्ये प्रथमच हिंदमाता येथे वाहतूक वळवावी लागली नाही.’’