मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र तूर्तास त्यांना अटक करण्यात येणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले आहे. हा गुन्हा रहित करण्यात यावा, यासाठी परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सरकारच्या वतीने वरील आश्वासन देण्यात आले. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असतांना परमबीर सिंह यांनी सहस्रो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. परमबीर सिंह यांच्यासह ३२ पोलीस अधिकार्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता या याचिकेवर २० मे या दिवशी सुनावणी होणार आहे.