तज्ञांशी बोलून येत्या २-३ दिवसांत दळणवळण बंदीविषयीचा निर्णय घेणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – शासन जनतेच्या हितासाठीच पावले उचलत आहे; मात्र परिस्थिती अशीच राहिली, तर आहे ती परिस्थिती उघड्या डोळ्यांनी मी स्वीकारू शकत नाही. आता मी पूर्ण दळणवळण बंदीची चेतावणी देत आहे; मात्र आता दळणवळण बंदी घोषित करत नाही. कोरोनाला रोखायचे असेल, तर दळणवळण बंदी करावी लागेल; मात्र याविषयी मी आताच घोषणा करत नाही. येत्या २-३ दिवसांत तज्ञांशी बोलून याविषयी निर्णय घेण्यात येईल, अशी महाराष्ट्रात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी गर्भीत चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली आहे. २ एप्रिलला रात्री ८.३० वाजता थेट प्रक्षेपणाद्वारे उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी उद्धव ठाकरे त्यांनी दळणवळणबंदी टाळण्यासाठी मी दुसरा पर्याय  शोधत आहे आहे. यासाठी तज्ञांशी पत्रकार, डॉक्टर, विरोधी पक्षनेते आदींशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले. विरोधी पक्षालाही राजकारण न करता कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास दळणवळणबंदीचा पर्याय वापराला लागेल. परिस्थिती सुधारण्यासाठी २ दिवसांची वाट पाहून निर्णय घेऊ, असे शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१. दळणवळणबंदी टाळण्यासाठी मी दुसरा पर्याय शोधत आहे आहे. विरोधी पक्षानेही राजकारण न करता कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सहकार्य करावे.
२. महाराष्ट्रात कोरोना चाचण्या करण्याची क्षमता प्रतीदिन १ लाख ८२ सहस्रपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये केंद्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार ‘आर्टीपीसीआर्’ पद्धतीने चाचण्यांचे प्रमाण ७० टक्के आहे. केंद्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कुठेही दर्जाशी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राची परिस्थिती धक्कादायक वाटत असली, तरी आम्ही सत्य जनतेपुढे ठेवत आहोत.
३. राज्यात बेडची संख्या पावणेचार लाखपर्यंत वाढवण्यात आली आहे. २ एप्रिल या दिवशी राज्यात
४५ सहस्राहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत ? याच वेगाने रुग्ण वाढले, तर राज्यासाठी
धोकादायक आहे.
४. सद्यस्थितीत महाराष्ट्रात २ लाख २० सहस्र विलगीकरणाचे बेड आहेत, त्यांतील ६२ टक्के बेड भरले आहेत. अतिदक्षता विभागातील २० सहस्र ५२१ बेडपैकी ४८ टक्के बेड रुग्णांनी भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यांचे बेड प्रत्येकी २५ टक्के इतके भरले आहेत. ही सर्व परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.
५. परिस्थिती अशीच राहिली, तर १५-२० दिवसांत परिस्थिती कठीण होईल. आपणाला सुविधा वाढवता येतील; मात्र डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कुठून आणणार ? मागील वर्षभर वैद्यकीय कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे.
६. राज्यात ३ लाख नागरिकांना दरदिवशी कोरोनावरील लस देत आहोत. पुरवठा अधिक झाल्यास लसीचे प्रमाण दुपटी-तिपटीने वाढवू. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडायची आहे. हे एकट्याचे युद्ध नाही. आता थोडाच काळ राहिला आहे. स्वयंशिस्तीने कोरोनाचा संसर्ग रोखता येईल.
७. दळणवळणबंदी अतिशय घातक आहे. काही पक्ष दळणवळबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरा. ही लढाई रस्त्यावर उतरूनच एकत्रित लढावी लागणार आहे.
८. मास्क न वापरण्यात शूरता नाही. अनावश्यक गर्दी टाळावी लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली, तर नोकरी जाईल. नोकरी पुन्हा मिळेल; मात्र गेलेला जीव पुन्हा आणता येणार नाही.
९. मी तुमच्या कुटुंबातीलच एक आहे. यंत्रणा आणि आरोग्य सुविधा यांमध्ये शासन न्यून पडणार नाही; मात्र टाळी एका हाताने वाजणार नाही.
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा !