खाण घोटाळ्याच्या प्रकरणी खाणमालकांकडून पैसे वसूल करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विशेष अन्वेषण पथकाचे अन्वेषण योग्य मार्गाने असल्याचे प्रतिपादन

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची स्तुत्य घोषणा !

पणजी, २५ मार्च (वार्ता.) – खाण घोटाळ्याच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाचे (एस्.आय.टी.) अन्वेषण योग्य मार्गाने चालू असून या घोटाळ्याच्या प्रकरणी शहा आयोगाच्या अहवालात दोषारोप ठेवण्यात आलेल्या खाण आस्थापनांकडून विशेष अन्वेषण पथक पैसे वसूल करू शकणार नसले, तरी हे पैसे खाण खाते वसूल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘विशेष अन्वेषण पथकाने शहा आयोगाने दोषारोप ठेवलेल्या विविध खाण आस्थापनांच्या आणि खाण खात्याचे संचालक यांच्या विरोधात आतापर्यंत १६ प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवले आहेत, तर ८ आरोपपत्रे प्रविष्ट केलेली आहेत. १६ कोटी रुपये वसुलीला अनुसरून संबंधित खाण आस्थापनांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. शासनाने खाण आस्थापनांकडून पैसे वसूल करणार असल्याचे न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे कळवले आहे. खाण घोटाळ्यामुळे किती हानी झाली, हे पहाण्यासाठी नेमण्यात आलेल्या लेखा परीक्षकांच्या (चार्टर्ड अकाऊंटंटच्या) गटाच्या लेखा (ऑडिट) अहवालाच्या आधारे शासन कृती करत आहे.’’

खाण आस्थापने खाण खाते चालवत आहेत का ? – विजय सरदेसाई, आमदार

विजय सरदेसाई

राज्यात खाण आस्थापने खाण खाते चालवत आहेत का ?, असा उपरोधिक प्रश्‍न आमदार विजय सरदेसाई यांनी विचारला. ते म्हणाले,‘‘खाण घोटाळ्याच्या प्रकरणी संबंधितांकडून पैसे वसूल करण्यास शासनाला पूर्णपणे अपयश आले आहे. शहा आयोगाने वर्ष २०१२ मध्ये राज्यातील खाण घोटाळ्यावरून प्रसिद्ध केलेल्या अहवालात अनेक गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. खाण घोटाळ्यामुळे शासनाचा अनुमाने ३५ सहस्र कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते; मात्र आतापर्यंत शासनाने एकही पैसा वसूल केलेला नाही.’’