कोल्हापूर, १० फेब्रुवारी – अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ११ फेब्रुवारी या दिवशी मेन राजाराम कॉलेज, भवानी मंडप येथे ऐतिहासिक दुर्ग परिषदेचे आयोजन केले आहे. याअंतर्गत राज्यभरातील ३५० हून अधिक किल्ल्यांविषयी चर्चा करण्यात येणार आहे. या परिषदेत दुर्ग संवर्धनाशी निगडित २२५ संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजन समितीचे सुखदेव गिरी यांनी दिली. या वेळी फत्तेसिंह सावंत, राम यादव, हेमंत साळोखे, संजय पवार, विनायक फाळके, धनंजय जाधव, योगेश केदार उपस्थित होते.
सुखदेव गिरी पुढे म्हणाले, ‘‘समितीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर घेतलेल्या दुर्ग परिषदेत पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि वनविभाग यांसह दुर्ग संवर्धन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या परिषेदनंतर राज्यात दुर्ग संवर्धनाच्या चळवळीला वेग आला होता. किल्ले रायगडनंतर होणार्या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांविषयीची माहिती आदींविषयी ऊहापोह होणार आहे. दुर्ग परिषदेत संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून राज्यातील विविध प्रकारचे जलदुर्ग, भुईकोट किल्ले, वनदुर्ग यांची माहिती एकत्रित करून ती भ्रमणभाषद्वारे ‘डिजिटल’ पद्धतीने संकलित केली जाणार आहे.’’