भीमाशंकर देवस्थान परिसरातील धबधबे पर्यटकांसाठी बंद; संबंधित परिसरात आल्यास कठोर कारवाई !

पुणे – भीमाशंकर देवस्थान दर्शन आणि वर्षा पर्यटनासाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणार्‍या पर्यटकांना अपघातप्रवण क्षेत्रामध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी वर्षासहलींसाठी या भागात येऊ नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश वन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढले आहेत. वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयारण्य भाग एक आणि भाग दोन मधील धबधब्यातील कुंडामध्ये भिजण्यासाठी स्थानिकांबरोबर सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबई येथून पर्यटक आवर्जून येत असतात. सध्या या धबधब्यांतील पाण्याला जोर असून पोहतांना पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतो.

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील डोंगरदर्‍यांमधील जंगलवाटा पावसामुळे निसरड्या झाल्या आहेत. गवत वाढल्याने वाटा पुसल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत अपघाताची, धुक्यामुळे वाट हरवण्याची शक्यता असते. पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन अभयारण्यातील सर्व निसर्गवाटा १ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपवनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण यांनी दिली. पर्यटकांनी अभयारण्यात नियमांचे काटेकोर पालन करावे. अनुमतीविना अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये, तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणार्‍या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.