शिक्षणात भारतीय संस्कृतीचा पुरस्कार न करणे हेच अधोगतीचे कारण !
सध्या अस्तित्वात असलेल्या मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीतून विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण दिले जात नाही. त्याचा परिणाम उच्च शिक्षण घेतलेली बहुतांश मुले आणि मुली मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, अनैतिक संबंध, अर्वाच्च भाषा या दोषांच्या आहारी गेल्याचे दिसून येते.
आत्मबळाच्या अभावामुळे विद्यार्थी तणावग्रस्त होतात आणि त्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बालवयापासून बलात्कार, हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश दिसून येतो. देशाचे भवितव्य असलेला युवा वर्ग अनैतिकतेकडे झुकलेला असेल, तर बुद्धीचा उपयोग हा समाज आणि देशाच्या भल्यासाठी न होता कुमार्गासाठी होतो. विद्यार्थ्यांना बालवयापासूनच नैतिकतेचे शिक्षण मिळाले, तर भविष्यात आदर्श पिढी निर्माण होईल; परंतु त्यातून समाज आणि राष्ट्र यांचे हितही आपोआपच जोपासले जाईल. यावरून नैतिकता आणि भारतीय संस्कृती यांवर आधारित शिक्षणाचे महत्त्व लक्षात येते.
श्री. प्रीतम नाचणकर (२८.५.२०२४)
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अंतर्गत ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या) अभ्यासक्रमात पालट करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षणतज्ञांनी सिद्ध केलेले या अभ्यासक्रमाचे प्रारूप (मसुदा) नागरिकांचे अभिप्राय आणि सूचना जाणून घेण्यासाठी ‘राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. या प्रारूपात संदर्भासाठी ‘मनाचे श्लोक’मधील १ श्लोक आणि ‘मनुस्मृती’मधील १ श्लोक देण्यात आला आहे. यावरून ‘अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि मनुस्मृति यांचा समावेश करण्यात येणार आहे’, याविषयी एका पत्रकाराने ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’चे खासदार शरद पवार यांना मत विचारले आणि त्यावर त्यांनी ‘मनाचे श्लोक अन् मनुस्मृति धर्मांधता, जातीयवादी आहे. ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय भरत आहेत ?’, अशा कुत्सित शब्दांत या संतवाङ्मयाची अवहेलना केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाच) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृति जाळण्याची घोषणा केली आहे. मुळात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रमाच्या प्रारूपामध्ये काय आहे ? हे आपण जाणून घेऊया. यातून शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या जातीयवादी राजकारणाचे खरे स्वरूप उघड होईल.
१. अभ्यासक्रमाच्या प्रारूपात मनुस्मृतीचा कोणता श्लोक आहे !
अभ्यासक्रमाच्या प्रारूपामध्ये पान क्रमांक ८४ वर ‘मूल्ये आणि स्वभाववृत्ती’ या शीर्षकाखाली मनुस्मृतीमधील पुढील श्लोकाचा समावेश आहे.
अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः ।
चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्धर्माे यशो बलम् ।।
– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १२१
अर्थ : वडिलधार्यांना उठून वंदन करणारा, वृद्धांची सेवा करणारा, त्यांचा मान ठेवणारा असा जो असतो, त्याचे आयुष्य, विद्या, कीर्ती आणि बळ या ४ गोष्टी वृद्धींगत होतात.
प्रारूपात वरील श्लोक देण्यात आला आहे. याचा अर्थ त्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, मानवी आणि राज्यघटनेची मूल्ये, आदरभाव, स्वच्छता, सभ्यता, सार्वजनिक मालमत्तेविषयीचा आदर, दायित्व, समानता आदी विकसित होण्यासाठी, तसेच विद्यार्थीदशेपासून हे गुण विकसित व्हावेत, यासाठी केवळ संदर्भ म्हणून हा श्लोक प्रारूपात देण्यात आला आहे. ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार आणि मंत्री राहिलेल्या जितेंद्र आव्हाड यांना याविषयी जाण नाही, हे शक्य नाही. या श्लोकाचा विपर्यास करून त्याद्वारे ही मंडळी जातीयवादाचे राजकारण करत आहेत.
२. पाठांतर स्पर्धेत ‘मनाचे श्लोक’ यांचा समावेश
अभ्यासक्रमाच्या प्रारूपामध्ये इयत्ता ३ री ते ५ वीसाठी १ ते २५ मनाचे श्लोक, इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक, तर इयत्ता ९ ते १२ वीसाठी ‘भगवद्गीते’मधील अध्याय १२ अशा प्रकारे पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्याचे सुचवण्यात आले आहे. भारताचा भाषिक वारसा जपण्यासाठी या पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ‘मनाचे श्लोक’ पाठांतराच्या स्पर्धा शाळांमध्ये वर्षानुवर्षे आयोजित केल्या जात आहेत आणि ‘भगवद्गीते’च्या पाठांतराविषयी या मंडळींना काय आक्षेप आहे ? यांविषयी त्यांनी घोषित करावे.
३. मोगलांच्या उदात्तीकरणाला कधीच विरोध केला नाही !
काँग्रेसच्या काळात ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी’.च्या) पाठ्यक्रमात भारतातील राष्ट्रपुरुषांचा नव्हे, तर देशावर आक्रमण करणार्या मोगलांचा इतिहास देण्यात आला होता; मात्र त्या वेळी शरद पवार किंवा जितेंद्र आव्हाड यांनी कधीही त्याला विरोध केला नाही. आता भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षणपद्धत लागू करण्यात आल्यावर आणि मनुस्मृतीमधील एक श्लोक दिल्यावर ही मंडळी जातीयवादाने गळा काढत आहेत. ज्यांनी भारतातील पितृशाहीवर आक्रमण केले, त्या मोगलांचा इतिहास यांना चालतो; परंतु नैतिकतेचे शिक्षण असूनही केवळ जातीयवादाच्या घाणेरड्या विचारसरणीतून शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांसारखी मंडळी याला विरोध करत आहेत.
४. चार स्तरांवर असणार अभ्यासक्रम !
३ ते ८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर, ८ ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पूर्वसिद्धता स्तर, ११ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक स्तर आणि १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक स्तर. कला आणि शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण, प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमान, भाषा शिक्षण, गणिताचे शिक्षण, विज्ञान, सामाजिकशास्त्र यादृष्टीने अभ्यासक्रम असणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आनंददायी वाटेल, शिकण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेता येईल, अशी शालेय संस्कृती असावी, यासाठी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे.
५. प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारित अभ्यासक्रम
अभ्यासक्रमामध्ये भारताची समृद्ध सांस्कृतिक सभ्यता, परंपरा, वारसा यांचा अभिमान निर्माण करणारे शिक्षण असणार आहे. गणित, तत्त्वज्ञान, कला, योगशास्त्र, अर्थशास्त्र, कृषी, आरोग्यशास्त्र, खगोलशास्त्र, वास्तूशास्त्र, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, हस्तकला, काव्य, साहित्य यांची अभ्यासक्रमातून जागृती केली जाणार आहे. भारतीय गुरु-शिष्य परंपरेचा केंद्रीभूत विचार आहे.
६. इयत्ता १२ वीपर्यंत मातृभाषा अनिवार्य !
विद्यार्थ्यांनी १५ वर्षांपर्यंत २ भारतीय भाषा आणि १ परकीय भाषा अभ्यासावी. इयत्ता १२ वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा अनिवार्य असणार आहे. ज्या माध्यमाची शाळा असेल, त्या शाळेत त्या भाषेला प्रथम भाषेचा दर्जा असेल. हीच भाषा त्या शाळेच्या अभ्यासक्रमाची भाषा असेल.
७. संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी अभिमान निर्माण करणारे शिक्षण
हा अभ्यासक्रम ‘एक व्यक्ती ते एक समाज ते एक राष्ट्र’ म्हणून बघण्यास साहाय्यभूत ठरेल, अशा शिक्षणाचा या अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. यामध्ये सकारात्मक कार्य, नीतीमत्ता, जिज्ञासा, भारतीयत्वाचा अभिमान या मूल्यांचा समावेश असणार आहे.
८. मूल्यशिक्षणावर भर
सद्यःस्थितीत वर्गातील संवादाचा केंद्रबिंदू म्हणून पाठ्यपुस्तक शिकवून पूर्ण करण्याची, म्हणजेच घोकमपट्टीद्वारे कारकूनीपद्धत आणि केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या मानसिकतेतून अभ्यासक्रम शिकवला जातो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अनेक संसाधनांपैकी पाठ्यपुस्तक हा एक दुवा आहे. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमात केवळ पाठ्यपुस्तक केंद्रित दृष्टीकोनात पालट करण्यात येणार आहे. यामध्ये पाठ्यपुस्तकाला संबंधित विषयांची पुस्तकेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पाठ्यपुस्तकांच्या गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे. शाळेच्या एकूण २२० दिवसांपैकी २० दिवस मूल्यांकनासाठी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
९. दहा दिवस दप्तराविना शाळा
इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १० दिवस दप्तराविना असणार आहेत. यामध्ये सुतार, माळी, कुंभार यांसह अन्य कला या कालावधीत शिकवल्या जाणार आहेत. यामध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे, स्मारके यांना भेट, स्थानिक कलाकार, कारागीर यांची भेट, गाव, तहसील कार्यालय, जिल्हा किंवा राज्यातील उच्च शैक्षणिक संस्था यांना भेट देण्याचे नियोजनही यामध्ये केले जाणार आहे.
१०. शिवकालीन शौर्य परंपरा आणि संतांची परंपरा यांचा अभ्यासक्रमात समावेश
महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, वारसा, प्राचीन आणि समकालीन ज्ञान, वेदकथा, गुरु-शिष्य परंपरा यांचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील शिक्षणतज्ञ आणि विचारवंत यांचा परिचयही अभ्यासक्रमात अंतर्भूत असेल. शिवकालीन संस्कृती, जलनीती, वाहतूक आणि तंत्रज्ञान, बांधकाम व्यवस्थापन यांचाही अभ्यासक्रमात समावेश असेल.
११. भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित अभ्यासक्रम
‘भारताच्या प्राचीन वारशापासून आधुनिक विचारवंतांपर्यंत शिक्षणाची समग्रदृष्टी आणि त्यांची ध्येये दृढपणे रूजवणे. गुरु-शिष्य परंपरेचा गाभा हा मुख्यत्वे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध केंद्रस्थानी ठेवून प्रभावी अध्ययन करणे. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता रूजवणे’, हे भारतीय ज्ञानप्रणालीचे वैशिष्ट्य आहे. नवीन अभ्यासक्रमाद्वारे हा उद्देश साध्य करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. भारतियांच्या िवविध क्षेत्रातील योगदानाचा समृद्ध इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, चाणक्य, चक्रपाणी, माधव, पाणिनी, पतंजलि यांसारखे महान विद्वान भारतीय शिक्षणव्यवस्थेनेच निर्माण केले. ज्यांचे कला आणि विविध क्षेत्रांत योगदान आहे. यांमुळे भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान यांचा जगावर प्रभाव आहे. हे लक्षात घेऊन यासाठी ‘भारतीय ज्ञान संस्कृती परीक्षा देऊया !’, या उपक्रमाचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे.
१२. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडण्यासाठी ऋषिमुनींचा आदर्श !
मानवी जीवनात योगाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन प्राणायाम आणि योगासने यांचे शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळावे, याचा प्रयत्न या शिक्षणप्रणालीमध्ये असेल. यासाठी ‘भारतीय ऋषी जाणून घेऊया’ या विषयावरून दिनचर्या, आहार, राहणीमान, गुरु-शिष्य परंपरा, जीवनविषयक दृष्टीकोन, ग्रंथसंपदा यांतून ऋषिमुनींनी दिलेल्या आदर्श जीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांवर बिंबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षणातून चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवणे, हे नवीन शिक्षणप्रणालीचे मुख्य ध्येय असणार आहे. अतिशयोक्ती आणि कल्पनाशक्ती यांमध्ये न अडकता भारताच्या शास्त्रीय तत्त्वज्ञानावर आधारित तत्त्वज्ञानाचा पुरस्कार अभ्यासक्रमात केला जणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सकारात्मक नाते निर्माण होण्यासाठी भर दिला जाणार आहे. यासह परिसराविषयी आपुलकी आणि आदर निर्माण होणे या गोष्टींवरही भर दिला जाणार आहे.
१३. भारतीय ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम
योग, स्थापत्य, वैद्यकशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी, भाषाशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, साहित्य, क्रीडा, आदिवासी वांशिक औषधी पद्धत, स्थानिक आणि पारंपरिक शिक्षणपद्धत, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, नैसर्गिक शेती, पारंपरिक पीक लागवड, विविध खेळ, वन व्यवस्थापन आदी भारतीय ज्ञानावर आधारित नवीन अभ्यासक्रम असणार आहे.
१४. महाराष्ट्रातील ज्ञान परंपरेचा समावेश
महाराष्ट्रातील संत परंपरा, संतांची शिकवण, संत साहित्य, वारकरी संप्रदाय, सण-उत्सव, थोर पुरुष आदींची ओळख या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे. राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी त्यांच्यावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील गडांवरील शिलालेख, ताम्रपट यांच्याविषयी अनुभवजन्य ज्ञानाचा समावेशही अभ्यासक्रमात असेल.
१५. विद्यार्थ्यांमध्ये मूल्य विकसित करण्याचा दृष्टीकोन
शालेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मूल्य विकास करणे यांवरही अभ्यासक्रमात भर असणार आहे. कचरापेटीचा उपयोग करणे, रांगेत उभे रहाणे, वेळेचे पालन करणे अशा छोट्या-छोट्या कृतींमधून विद्यार्थ्यांमध्ये गुणांची वृद्धी करण्यावर भर देणे. यासह चर्चा, वाचन यांद्वारे देशभक्ती, त्याग, प्रामाणिकपणा, सहनशीलता, क्षमा, सभ्यता आदी गुण विकसित करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
या शिक्षणप्रणालीवर केवळ जातीयवादाच्या चष्म्यातून पहाणारी मंडळी यातून केवळ भारतीय संस्कृतीचे अध:पतन करत आहेत. एवढेच नव्हे, तर देशाला अधोगतीकडे नेण्याचा मार्ग चोखाळत आहेत. त्यामुळे सुजाण देशवासियांनी अशा जात्यंध मंडळींना सनदशीर मार्गाने विरोध करायला हवा.
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (२८.५.२०२४)