Quran Burner Salwan Momika : स्विडनमध्ये वारंवार कुराण जाळणार्‍या सलवान मोमिका यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त

अद्याप अधिकृत दुजोरा नाही !

सलवान मोमिका

स्टॉकहोम (स्विडन) – येथे पोलीस आणि न्यायालय यांच्या अनुमती घेऊन सार्वजनिक ठिकाणी अनेकदा कुराण जाळणारे सलवान मोमिका यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त युरोपमधील प्रसारमाध्यमांनी दिले आहे; मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सलवान मोमिका हे ३७ वर्षीय निर्वासित इराकी ख्रिस्ती होते. त एप्रिल २०१८ मध्ये स्विडनला आले आणि एप्रिल २०२१ मध्ये त्यांना निर्वासित म्हणून दर्जा मिळाला. त्यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर स्वतःची ओळख नास्तिक आणि लेखक अशी केली आहे.  मोमिका यांनी २८ जून २०२३ या बकरी ईदच्या दिवशी स्टॉकहोममधील सर्वांत मोठ्या मशिदीसमोर कुराण जाळले होते. ‘कुराण हे जगातील सर्वांत धोकादायक पुस्तक आहे’, असे मोमिका यांनी म्हटले होते. ‘मी इस्लामी विचारणीच्या विरोधात पुकारलेला लढा चालू ठेवणार’, असेही म्हटले होते.

१. मोमिका यांच्या या कृतीमुळे स्विडनला इस्लामी देशांतून मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला, तसेच तेथील लोकांवर आक्रमणांची प्रकरणेही वाढली.

२. ५७ इस्लामी देशांची संघटना असलेल्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ने सांगितले की, आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करण्याची आणि अशा घटना रोखण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

३. मोमिका यांच्या कृतीमुळे पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथेही कुराण जाळण्याच्या घटनेच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले.