अध्यात्मातूनच प्रेम मिळते ! – कुमार विश्वास, कवी, व्याख्याते

पुणे येथील ‘वुई आर् इन धिस टुगेदर’ या मोहिमेच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाचे उद्घाटन !

पुणे – भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये नोकरी करणे, हे सार्थक आहे; पण चांगला मनुष्य बनणे आवश्यक आहे. प्रत्येकाला आधुनिक वैद्य, अभियंता, नेता बनायचे आहे; पण त्याआधी आपल्याला चांगली व्यक्ती बनावे लागणार आहे; अन्यथा चोर निर्माण होतील. या जगात धार्मिक कट्टरतेमुळे द्वेष पसरत आहे, तर प्रेम हे केवळ अध्यात्मातून मिळते, असे प्रतिपादन कवी, व्याख्याते कुमार विश्वास यांनी केले. ते दैनिक ‘सकाळ’च्या ‘वुई आर् इन धिस टुगेदर’ या मोहिमेच्या ‘स्वास्थ्यम्’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सुरेल गायन अन् तेवढ्याच सुरेखपणे शब्दांची उकल करत रामायण-महाभारतातील संदर्भ देत उत्तम मानसिक स्वास्थ्याचा अर्थ विश्वास यांनी समजावून सांगितला.

ते म्हणाले, ‘‘पुणे ही आध्यात्मिक नगरी आहे. मी पुण्यात अनेक कार्यक्रम केले; परंतु अध्यात्माकरता प्रथमच या सभागृहामध्ये आलो. आध्यामिक विचार ऐकण्याकरिता आज हे तरुण आलेले आहेत, हे फारच महत्त्वाचे आहे. व्याधी केवळ शरीरात नाहीत, तर त्या मनात, विचारांमध्येही असतात. भारतात लोक ५० वर्षे विवाह बंधनात रहातात, त्याचे जगाला आश्चर्य वाटते. भौतिकशास्त्रात ‘गॉड पार्टिकल’ (देव कण) असतो. तो दिसतो कसा ? त्याचा आकार किती आहे ? हे माहिती नाही; पण तोच सगळे चालवतो. हेच आपण गेली सहस्रो वर्षे देवांविषयी सांगत आलो आहे; पण पाश्चिमात्य देशांनी सांगितले, ते आपल्याला खरे वाटते.’’