हाथरस (उत्तरप्रदेश) येथील सत्संगानंतर चेंगराचेंगरी : १२० हून अधिक जणांचा मृत्यू

हाथरस (उत्तरप्रदेश) – येथील रतीभानपूरमध्ये असलेल्या फुलराई गावात भोले बाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घायाळांची संख्या मोठी असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. घायाळांना उपचारार्थ रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकार्‍यांना तातडीने घटनास्थळी पोचून जलद गतीने साहाय्य करण्याचे निर्देश दिले. तसेच या घटनेची चौकशी करून २४ घंट्यांत अहवाल सादर करण्याचाही आदेश त्यांनी दिला. या आदेशानंतर २ मंत्री घटनास्थळी पोचले.

मृतांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये, तर घायाळांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

येथे मोठ्या मैदानावर सत्संग चालू होता. सत्संग संपल्यानंतर भाविक सर्वांत आधी तेथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागल्यावर चेंगराचेंगरी झाली. यात लोक एकमेकांवर पडले आणि त्यात दबले गेले. त्यामुळे अनेकांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला.

संपादकीय भूमिका

  • सत्संग, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी धार्मिक संस्थांनी काळजी घेणे आवश्यक आहे !
  • मोठ्या संख्येने लोक गोळा होणार्‍या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रशासन आणि पोलीस यांनी जाऊन याची माहिती आधीच का घेतली नाही ? तेथे पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात !