जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत

पालखीत बसलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (पांढरा फेटा घातलेले) आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (मास्क गळ्याला लावलेले)

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ५ जुलै (वार्ता.) – नीरा नदी ओलांडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ५ जुलैच्या सकाळी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे आगमन झाले. या वेळी संत तुकाराम महाराजांचे अश्व आणि पादुका यांचे पूजन करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दर्शन घेतले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. संतोष महाराज मोरे, ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला. सराटी येथून अकलूज येथे पालखी आल्यानंतर पालखीचे स्वागत जिल्हा प्रशासनाने केले. पालखीच्या स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.

संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यात सहभागी भाविक

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापुरातील पहिले गोल रिंगण !

संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या गोल रिंगणात धावतांना अश्व

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हंडे-तुळशी, विणेकरी, मृदंग आणि टाळकरी यांचे रिंगण झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अश्वपूजन करून अश्व रिंगणी धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणी ठरली !

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा