साधकांशी सहजतेने जवळीक साधणारे आणि साधकांच्या साधनेची काळजी घेणारे सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७० वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (८.६.२०२२) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त साधिकेने त्यांच्यातील उलगडलेले गुण पुढे दिले आहेत.

१. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका पित्यासमान भासणे आणि त्यांच्याशी बोलतांना आनंद होणे

श्रीमती उषा बडगुजर

मला पित्यासमान असलेले सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांशी बोलतांना फार आनंद होतो. सौ. सुनंदा जाधवकाकू (सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सद्गुरु काका मला माता-पित्यासम आहेत.

२. पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत सेवारत असूनही तोंडवळ्यावर आनंद जाणवणे

सद्गुरु काका पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत सेवारत असतात, तरीही ते थकलेले दिसत नाहीत. त्यांना शारीरिक त्रास होतो; पण त्रासाची तीव्रता त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच जाणवत नाही. त्यांच्या तोंडवळ्यावर सातत्याने आनंदी भाव असतो.

३. प्रीतीमय वागण्याने साधकांचे आधारस्तंभ बनलेले सद्गुरु जाधवकाका !

सद्गुरु काका शांत आणि प्रेमळ असून ते सर्वांशी खेळीमेळीने वागतात. त्यामुळे साधकही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतात. मी सद्गुरु काकांना अडचण सांगितल्यावर ते मला त्यावर तत्परतेने उपाययोजना सांगतात. माझा नातू (कु. सोहम् बडगुजर (मुलाचा मुलगा, आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १० वर्षे) २ – ३ वर्षांचा असतांना सद्गुरु काका त्याच्याशी आनंदाने खेळायचे. ते त्याचे लाड करायचे आणि त्याला खाऊही द्यायचे. सद्गुरु काका साधकांचे आधारस्तंभ आहेत.

४. ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, याची तीव्र तळमळ

४ अ. ‘साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले व्हावेत’, यासाठी त्यांना दिशा देणे : सद्गुरु काका साधकांना ‘साधनेचे प्रयत्न कसे करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करतात. त्यांना ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी तीव्र तळमळ असल्याने ते साधकांच्या व्यष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी प्रयत्न करतात.

४ आ. साधकांना ध्येयाची जाणीव करून देणे : सद्गुरु काका साधकांना ‘आपल्याला गुरुदेवांसाठी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी) सर्वकाही करायचे आहे’, याची जाणीव करून देतात. ते साधकांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे प्रयत्न करणे’, हे ध्येय आहे’, याची जाणीव करून देतात आणि साधकांची गुरुदेवांप्रती श्रद्धा वृद्धिंगत करतात.

५. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

अ. सद्गुरु काकांशी बोलतांना ‘चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवते आणि माझा उत्साह वाढतो.

आ. सद्गुरु काका भावगीत आणि भजन म्हणतात, तेव्हा माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात. ‘ते गात असलेले भजन ऐकतच रहावे’, असे मला वाटते.

इ. सद्गुरु काकांची आठवण झाल्यावर माझा भाव जागृत होतो. त्यांची आठवण झाल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन माझे मन आनंदी होते.

– श्रीमती उषा बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६३ वर्षे), जळगाव (२२.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक