साधनेचे संस्कार करणारे आपले साधक माता-पिता सौ. साधना आणि श्री. अशोक दहातोंडे यांच्याविषयी कु. वेदिका दहातोंडे (वय १५ वर्षे) हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

कु. वेदिका दहातोंडे हिच्या आई सौ. साधना दहातोंडे रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करतात आणि तिचे वडील श्री. अशोक दहातोंडे देहली सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ सेवा करतात. कु. वेदिकाला लक्षात आलेली आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी वेदिकावर केलेले संस्कार यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

कु. वेदिका दहातोंडे

१. आपली एकुलती एक मुलगी सर्वार्थांनी आदर्श व्हावी, यासाठी प्रयत्न करणारे श्री. अशोक दहातोंडे !

श्री. अशोक दहातोंडे

१ अ. अनावश्यक लाड न करता मुलीवर चांगले संस्कार करणे

मी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असूनही वडिलांनी माझे कधी अनावश्यक लाड केले नाहीत. बाबांच्या परिचयाच्या व्यक्ती त्यांना म्हणायच्या, ‘‘तुम्हाला एकच मुलगी आहे, तर तुम्ही तिचे पुष्कळ लाड करायला हवेत.’’ बाबांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मला शिस्त लावून माझ्यावर चांगले संस्कार केले. माझ्यावर साधनेचे संस्कार करतांना त्यांनी भावनाशीलतेने मला मानसिक स्तरावर कधी हाताळले नाही. माझे वागणे आदर्श व्हावे, यासाठी ते प्रयत्नशील असतात. शिक्षण आणि साधना यांसाठी मला या गोष्टीचा लाभ झाला.

१ आ. मला साधनेत साहाय्य होण्याच्या दृष्टीने ते साधना करतांना त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे सांगतात.

१ इ. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे 

१ इ १. हितचिंतकांशी जवळीक साधणे : बाबा सेवेला जेथे जातात, तेथे सगळ्यांशी जवळीक साधतात. ते अधून-मधून हितचिंतकांची विचारपूस करतात. ते त्या सर्वांना ‘ऑनलाईन सत्संगांची लिंक’ आणि ‘पोस्ट’ पाठवतात.

१ इ २. सणांविषयीची पत्रके शाळेत देऊन प्रबोधन करणे : ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छापण्यात येणारी सणांविषयीची पत्रके शाळेच्या मुख्याध्यापकांना आवर्जून देत आणि त्यांना प्रत्येक वर्गात ती वाचून दाखवण्याची विनंती करत. शाळेतील शिक्षक प्रत्येक वर्गात ती पत्रके वाचून दाखवत असत.

१ इ ३. बाबांनी आतापर्यंत अनेक संतांची सेवा करून त्यांचे मन जिंकले आहे. संतही बाबांची आठवण काढतात.

२. मुलीला तत्त्वनिष्ठतेने घडवणार्‍या सौ. साधना दहातोंडे !

सौ. साधना दहातोंडे

२ अ. तत्त्वनिष्ठ

माझे दायित्व असलेल्या साधकांना आई माझ्याकडून झालेल्या चुका आणि अन्य सूत्रे यांविषयी तत्त्वनिष्ठतेने सांगते. त्यामुळे मलाही साधनेत प्रयत्न करायला साहाय्य होते.

२ आ. देवावर श्रद्धा

आध्यात्मिक त्रास होत असल्यास आई देवाला आर्ततेने प्रार्थना करते. देव तिला आवश्यक तो नामजप सुचवतो अन् तिचा त्रास उणावतो. तिची शारीरिक स्थिती ठीक नसतांनाही ती मनापासून सेवा करते. त्या वेळी ‘तिला त्रास होत आहे’, असे जाणवतही नाही. देवावरील श्रद्धेच्या बळावर ती सेवा करते. सेवा करतांना तिला अनेक अनुभूती येतात, उदा. सेवेत येणार्‍या अडचणी सुटणे. त्या वेळी ‘देवच साहाय्य करतो’, हे तिला प्रकर्षाने जाणवते.

३. आई-वडिलांची जाणवलेली सामाईक गुणवैशिष्ट्ये

३ अ. काटकसरी

आई-बाबा सर्व वस्तूंचा काटकसरीने वापर करतात. ते स्वतःसाठी आवश्यक तेवढेच कपडे आणि खाऊ घेतात. त्यांच्याकडे जे आहे, त्यातच ते समाधान मानतात.

३ आ. मुलीवर केलेले धर्माचरणाचे आणि अन्य संस्कार

१. आई-बाबांनी माझ्यासाठी कधीही पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे घेतले नाहीत. त्यांनी माझे केस कधीही कापले नाहीत. ते मला नेहमी कपाळाला कुंकू आणि हातात बांगड्या घालूनच शाळेत पाठवत असत.

२. त्यांनी मला कधी बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लावली नाही. त्यांनी स्वतःहून मांसाहार करणे साेडून दिले आणि मलाही तो करू दिला नाही. ते मला घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ, तसेच पालेभाज्या आवर्जून खायला द्यायचे.

३. त्यांनी कधी करमणुकीसाठी दूरचित्रवाणी संच विकत घेतला नाही; पण मला अभ्यासासाठी संगणक विकत घेतला होता.

४. ते माझ्याकडून मोठ्याने स्तोत्रपठण करून घेत. मी स्तोत्रे म्हणत असतांना माझे काही शब्द चुकल्यास ते सुधारणा करून सांगत आणि स्तोत्रांचा अर्थही समजावून सांगत.

३ इ. तत्त्वनिष्ठ राहून मुलीला चुका सांगणे आणि चुकीबद्दल शिक्षा करून त्यातूनही साधना करून घेणे

माझ्याकडून एखादी चूक झाल्यास ‘माझ्यात सुधारणा व्हावी’, यासाठी ते मला त्याची जाणीव करून द्यायचे आणि शिक्षाही करायचे. त्यांनी दिलेली शिक्षा मी सुधारण्याच्या दृष्टीने आणि त्यातून माझी साधना होण्यासाठी असायची, उदा. सारणीत १० चुका लिहिल्याविना महाप्रसाद घ्यायचा नाही आणि नामजप लिहिल्याविना झोपायचे नाही.

३ ई. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव

आई-बाबांनी स्वतःला साधनेत झोकून दिले आणि मलाही साधना करण्यासाठी गुरुचरणी अर्पण केले. ते मला म्हणतात, ‘‘आम्ही तुझे केवळ जन्मदाते आई-वडील आहोत. तुझा सांभाळ करणारे गुरुदेवच आहेत.’’

‘हे गुरुदेवा, मला साधनेसाठी साहाय्य करणारे आई-वडील दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आपणच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !

– कु. वेदिका अशोक दहातोंडे (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२२)