रशियाविरुद्धच्या युद्धात जगाने आम्हाला वार्‍यावर सोडले ! – युक्रेन

युक्रेनला साहाय्य करण्याचे आश्‍वासन देऊनही अमेरिका, युरोपीय देश आणि ‘नाटो’ देश यांच्याडून ऐनवेळी माघार

प्रत्येकाला स्वतःचे युद्ध स्वतःच लढावे लागते, हेच यातून सिद्ध होते. भारतानेही यातून बोध घ्यावा ! – संपादक

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – रशियाविरुद्धच्या युद्धात जगाने आम्हाला एकटे सोडले आहे. आमच्यासमवेत लढायला कोण सिद्ध आहे ? मला कुणी दिसत नाही. युक्रेनला ‘नाटो’चे सदस्यत्व देण्याची हमी देण्यास कोण सिद्ध आहे ? कुणीच नाही. सगळे घाबरले आहेत, अशा खंत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात केली. अमेरिका, युरोपीय देश आणि ‘नाटो’ देश यांनी युक्रेनला रशियाविरुद्ध साहाय्य करण्याचे आश्‍वासन देऊनही वार्‍यावर सोडल्यामुळे झेलेंस्की यांनी ही खंत व्यक्त केली आहे.

व्लोदिमिर झेलेंस्की यांनी मांडलेले विचार

१. सीमेवर तैनात युक्रेनच्या सैन्याने ज्मीनई बेटाचे रक्षण करतांना शौर्य दाखवले. ते हुतात्मा झाले; परंतु त्यांनी रशियाच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली नाही. दुर्दैवाने आज आम्ही आमच्या १३७ वीरांसह १० सैन्याधिकारी गमावले आहेत. या सर्वांना मरणोत्तर ‘हिरो ऑफ युक्रेन’ ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. युक्रेनसाठी ज्यांनी प्राण दिले, ते नेहमी लक्षात रहातील.

२. रशियाचे सैन्य कीवमध्ये पोचले आहे. मी येथे रहात आहे. माझे कुटुंबदेखील युक्रेनमध्ये आहे. माझे कुटुंब देशद्रोही नाही, ते युक्रेनचे नागरिक आहेत. ते नेमके कुठे आहेत, हे मी सांगू शकत नाही. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, शत्रूने मला लक्ष्य क्रमांक १, तर माझ्या कुटुंबाला लक्ष्य क्रमांक २ असे चिन्हांकित केले आहे.

रशियाच्या ८०० हून अधिक सैनिकांना ठार केले ! – युक्रेनचा दावा

युक्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने ८०० हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. ३० रशियन टँक आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट केली असल्याचाही दावा युक्रेनकडून करण्यात आला. युक्रेन सरकारने १८ ते ६० वयोगटांतील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने १० सहस्र नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्याचे सांगितले जात आहे.

रशियाच्या आक्रमणात आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू !

अमेरिकेच्या अहवालानुसार, रशियाने युक्रेनवर एकूण २०३ आक्रमणे केली आहेत. यांत एकूण १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

रशियाच्या सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनने ३ पूल उद्ध्वस्त केले !

रशियन रणगाडे युक्रेनची राजधानी कीवपासून केवळ १० मिलोमीटर दूर आहेत. त्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या सैन्याने ३ पूल उडवून दिले आहेत. ‘येत्या ९६ घंट्यांत, म्हणजे ४ दिवसांत कीव रशियाच्या नियंत्रणात जाईल’, अशी भीती झेलेंस्की यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, रशियाच्या सैन्याने निवासी भागांना लक्ष्य केले आहे.