ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन !

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर

मुंबई – मागील ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द  असणारे ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे २१ जानेवारीच्या पहाटे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.

मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार चालू होते. उपचाराच्या वेळी श्वसनाचा त्रास तीव्र झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात् पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मागील काही वर्षे ‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या संपादकपदाचे दायित्व त्यांनी समर्थपणे सांभाळले. त्यांनी मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाच्या ‘कृ.पां. सामक जीवनगौरव’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘पुढारीकार ग.गो. जाधव’ पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता’ पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दिनकर रायकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती. ते अत्यंत मितभाषी होते.

दिनकर रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढीला सांधणारी मार्गदर्शक भूमिका उत्तम पार पाडली ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रुजावेत यांसाठी दिवंगत रायकर यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय, संकल्पना आणि विषय यांची मांडणी यांसाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी निर्माण झाली. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करतांना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढीला सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरित्या पार पाडली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

सनातनच्या कार्याविषयी आत्मियता !

दिनकर रायकर यांनी सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमाला आवर्जून भेट दिली होती. सनातनच्या कार्याविषयी त्यांना आदर आणि आपुलकी होती. त्यांना नामजपादी साधनेची आवड होती. ते स्वत: नामजपादी साधना करायचे. त्यांच्याशी होणार्‍या भेटीच्या वेळी ते साधनेविषयी दीर्घकाळ चर्चाही करायचे. मी किंवा सनातनचे अन्य साधक त्यांना भेटण्यासाठी गेल्यास त्यांच्या व्यस्त कामातूनही ते आवर्जून वेळ द्यायचे. संस्थेच्या कार्याची ते आपुलकीने चौकशी करायचे. सनातन संस्था दिनकर रायकर यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, अशी सहवेदना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी व्यक्त केली आहे.

दिनकर रायकर यांना दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी माहिती सांगतांना  अभय वर्तक आणि अन्य

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या देवद (पनवेल) येथील विभागीय कार्यालयाला दिनकर रायकर यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये भेट दिली होती. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे राष्ट्र-धर्मविषयक कार्य आणि भूमिका त्यांनी वेळ देऊन समजून घेतली होती, तसेच त्याविषयी चर्चाही केली होती.