रामनाथी आश्रमात झालेल्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी श्री. नीलेश चितळे आणि सौ. नंदिनी चितळे यांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात झालेल्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी यजमान दांपत्य श्री. नीलेश चितळे आणि सौ. नंदिनी चितळे यांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात झालेल्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या विधींसाठी श्री. नीलेश चितळे आणि सौ. नंदिनी चितळे हे यजमान दांपत्य होते. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

डावीकडून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सौ. नंदिनी चितळे, पूर्णाहुती देतांना श्री. नीलेश चितळे आणि पुरोहित श्री. ईशान जोशी

१. श्री. नीलेश चितळे

श्री. नीलेश चितळे

१ अ. गुडघा दुखत असल्याने भूमीवर मांडी घालून बसता येत नसतांना पुण्याहवाचन विधीच्या वेळी भूमीवर सहजतेने मांडी घालून बसता येणे : ‘गेले अनेक मास (महिने) माझा गुडघा दुखत असल्याने मला भूमीवर मांडी घालून बसणे शक्य होत नाही. पुण्याहवाचन विधीच्या वेळी खाली बसण्याच्या वेळी क्षणभर माझ्या मनात शंका आली, ‘मला भूमीवर खाली बसता येत नाही, तर मी पूजा कशी करणार ?’ नंतर ‘देव काळजी घेईल’, असा विचार माझ्या मनात आला. पुण्याहवाचन विधीच्या वेळी मला भूमीवर सहजतेने मांडी घालून बसता आले. पूर्ण विधीच्या वेळी मला त्रास झाला नाही. देवाच्या कृपेमुळेच मला ही अनुभूती आली.

१ आ. पूर्णाहुतीच्या वेळी आलेल्या अनुभूती

१ आ १. ध्यान लागल्यासारखे वाटून प्रयत्नपूर्वक डोळे उघडे ठेवावे लागणे : पूर्णाहुतीच्या वेळी मी हातात ‘स्त्रुवा’ (तुपाची आहुती देण्यासाठी वापरलेले लाकडी साधन) धरला होता. यज्ञकुंडात तुपाची धार एका ठराविक प्रमाणात घालावी लागते. त्या वेळी मला केवळ डोळे आणि स्त्रुवा धरलेल्या हाताची बोटे यांची जाणीव होत होती. मला माझ्या देहाच्या अन्य अवयवांची जाणीव नव्हती. मला ध्यान लागल्यासारखे वाटत होते. मी डोळे बंद केल्यास मला तुपाची धार दिसणार नाही; म्हणून मला प्रयत्नपूर्वक डोळे उघडे ठेवावे लागत होते.

१ आ २. देवीच्या विशाल रूपाचे दर्शन होऊन आपोआप ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप होणे : आहुती देतांना मला देवीच्या विशाल रूपाचे दर्शन झाले. त्या रूपात ‘देवीला सहस्रो हात असून देवीचा रंग तेजस्वी निळा आहे’, असे मला दिसले. भवानीदेवीच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना विधी असूनही माझा ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप आपोआप होत होता. मला प्रयत्न करूनही हा नामजप थांबवता येत नव्हता.’

२. सौ. नंदिनी चितळे

सौ. नंदिनी चितळे

२ अ. श्री भवानीदेवीच्या स्वागतासाठी मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन चालणे

२ अ १. ‘मानदुखी, खांदेदुखी आणि डोकेदुखी यांचा सतत त्रास होत असल्याने भवानीदेवीच्या स्वागतासाठी मिरवणुकीत पाण्याने भरलेला पितळ्याचा कलश डोक्यावर घेऊन चालणे जमणार नाही’, असा नकारात्मक विचार येणे अन् सराव करतांनाही खांदे आणि दंड यांना रग लागणे : ‘सनातनच्या रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीचे आगमन होणार होते. त्या मिरवणुकीत मला देवीचे स्वागत करण्यासाठी पाण्याने भरलेला पितळ्याचा कलश डोक्यावर घेऊन साधारण ६०० मीटर अंतरावरून आश्रमापर्यंत चालत यायचे होते. हा कलश मुळात वजनाने जड होता आणि त्यात पाणीही होते. मला मानदुखी, खांदेदुखी आणि डोकेदुखी यांचा सतत त्रास होत असल्याने ‘मला हे जमेल का ?’, असे मला वाटत होते. मी सराव करण्यासाठी कलश डोक्यावर घेतल्यावर काही क्षणांतच माझे खांदे आणि दंड यांना रग लागली अन् ‘हे पुष्कळ कठीण आहे’, असे मला वाटले. मिरवणुकीत गेल्यावर सराव करतांनाही मला तसेच वाटले.

२ अ २. श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे मिरवणुकीत आगमन झाल्यावर देहाला हलकेपणा जाणवून ‘डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत कितीही अंतर चालू शकते’, असे वाटणे : त्यानंतर मिरवणुकीत प्रत्यक्ष श्री भवानीदेवीचे आगमन झाले. आम्ही १२ सुवासिनी देवीसमोर कलश घेऊन चालत होतो. त्या वेळी ‘माझ्या डोक्यावर काही वजन आहे किंवा माझे हात वर उचलले आहेत’, याची मला जाणीवही झाली नाही. मला देह एकदम हलका झाल्यासारखा वाटत होता. ‘मिरवणुकीत चालायचे अंतर अल्प आहे. मी असे कितीही चालू शकते’, असे मला वाटले. देवीने मला तिच्या स्वागताची सेवा दिली आणि ती माझ्याकडून करवून घेतली. त्यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२ आ. पूर्णाहुतीच्या वेळी आलेल्या अनुभूती

२ आ १. देहाला हलकेपणा जाणवणे : पूर्णाहुतीच्या वेळी मी यजमानांच्या (श्री. नीलेश यांच्या) हाताला दर्भ लावलेली छोटी काडी पकडून उभी होते. त्या वेळी मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. माझा देह इतका हलका झाला होता की, ‘फुंकर मारल्यावरही माझा तोल जाऊ शकतो’, असे मला वाटले. मी स्थिर उभी होते; पण ‘मी पुढे-मागे हेलकावे घेत उभी आहे’ (म्हणजे मी सतत हालते आहे.), असे मला वाटत होते. ‘मी हातात पकडलेला दर्भ माझ्या हातात आहे ना ?, तसेच तो यजमानांच्या हातावर टेकलेला आहे ना ?’, हे मला मधेच डोळे उघडून बघावे लागत होते.

२ आ २. माझ्या समोर पेटती यज्ञवेदी असूनही मला त्याची धग जाणवत नव्हती. मला शांत आणि स्थिर वाटत होते. ‘माझ्या सभोवती विधी चालू आहेत’, याची मला जाणीवही होत नव्हती.

भवानीदेवी आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने हे मला अनुभवता आले. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक