देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे स्वागतार्ह वक्तव्य आणि अनुत्तरित प्रश्न !

देशाचे संरक्षणमंत्री तथा भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी नुकतेच पुणे येथे टोकियो (जपान) येथील ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांच्या नावाच्या ‘स्टेडियम’चे उद्घाटन केले. उद्घाटनप्रसंगी राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘राजमाता जिजाऊ, समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले.’’ सिंह यांनी केलेल्या या विधानामुळे ब्राह्मणद्वेषी व्यक्ती आणि संघटना यांना पोटशूळ उठला. गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी या ब्राह्मण व्यक्तींना हटवण्यासाठी जात्यंध कार्यरत आहेत. याच ब्राह्मणद्वेषी कटकारस्थानाच्या अंतर्गत जात्यंध टोळीने राजकीय पाठिंब्याच्या बळावर जानेवारी २००४ मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची नासधूस केली होती, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना धमक्या दिल्या होत्या. या झुंडशाहीमुळे सत्य इतिहासाचे पाठीराखे असणार्‍यांकडूनही कधीकधी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात मोलाचे योगदान असणारे दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा थेट नामोल्लेख टाळण्याकडे कल असायचा. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पुणे शहरातील जाहीर कार्यक्रमात त्या अनुषंगाने वक्तव्य करणे महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह आहे.

सौ. गौरी कुलकर्णी

पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असणार्‍या भाजपकडून पुतळ्याच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न का नाहीत ?

असे असले, तरी काही प्रश्न अनुत्तरितच आहेत. वर्ष २०१० मध्ये पुणे महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असतांना पुण्यातील लाल महालातील समूहशिल्पातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठांसह भाजप, शिवसेना आणि मनसे यांनी या काळ्या कृत्याला विरोध केला होता. त्यानंतर ७ वर्षांनी म्हणजे वर्ष २०१७ मध्ये पुणे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. ‘जात्यंधांनी दादोजी कोंडदेव यांच्यावर केलेल्या अन्यायाचे बहुमताने सत्तेत असलेल्या भाजपकडून परिमार्जन होईल’, अशी अपेक्षा होती. थोडक्यात ‘भाजपच्या सत्ताकाळात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा सन्मानाने लाल महालात बसवला जाईल’, अशी अपेक्षा होती; पण ती पूर्ण झाली नाही. एवढेच नाही, तर भाजपला महापालिकेची सत्ता मिळण्याच्या काही काळ आधी जात्यंधांनी संभाजी उद्यानातून उखडून टाकलेला राम गणेश गडकरी यांचा पुतळाही अद्यापपर्यंत बसवण्यात आला नाही.

पुढच्या वर्षी म्हणजे वर्ष २०२२ मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘राजनाथ सिंह यांचे वक्तव्य म्हणजे स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या कानपिचक्या आहेत’, असे समजायचे का ? उखडलेले पुतळे बसवण्यासारख्या २ छोट्या गोष्टी जवळपास ५ वर्षांच्या कालावधीत करता येणे, खरेच शक्य नाही का ? जातीधर्माचे सूत्र सोडून दिले, तरी एखाद्या ऐतिहासिक, तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले आणि तोडफोड करण्यात आलेले महनीय व्यक्तींचे पुतळे पुनर्स्थापित न करणे, याला ‘स्मार्ट’ कारभार म्हणता येईल का ? (केंद्रशासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातील शहरांमध्ये पुणे शहराचा समावेश आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे सर्व प्रकारच्या पायाभूत आणि अत्याधुनिक सुविधा असलेले स्वच्छ अन् सुंदर शहर होय. – संकलक)

तात्त्विक भूमिकेला कृतीची जोड हवी !

राजनाथ सिंह यांनी पुणे येथील उद्घाटनाच्या कार्यक्रमात भारताच्या पौराणिक इतिहासात खेळांचाही समावेश असल्याचे सांगितले. या वेळी ते म्हणाले, ‘‘नालंदा, तक्षशीला विद्यापिठांमध्ये क्रीडाप्रकार शिकण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, दुर्गावती यांच्या जीवनातही खेळांना महत्त्व होते. हीच परंपरा आता भारतीय सैन्य पुढे नेत आहे.’’ संरक्षणमंत्री या नात्याने राजनाथ सिंह यांची विधाने महत्त्वाची आहेत. भारताचा इतिहासच शौर्याचा आहे. भारतीय समाज हा योद्धा समाज आहे. अफगाणिस्तानमधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच राजनाथ सिंह यांनी ‘प्रसंगी अफगाणिस्तानात जाऊनही भारतीय सैन्य आतंकवादाचा नायनाट करील’, असे विधान केले होते. आपल्याला ‘आतंकवाद्यांचा नायनाट कसा करायचा ?’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी कृतीतून शिकवले आहे. आता आवश्यकता आहे ती तात्त्विक भूमिकेला कृतीची जोड देण्याची ! समर्थ रामदासस्वामी यांनी ‘देशद्रोही तितुके कुत्ते…’ असे म्हणून ‘अंतर्गत आणि बाह्य देशद्रोह्यांवर कसा प्रहार करायचा ?’ याविषयी मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे राजधर्म आचरणात आणला, तर महनीय व्यक्तींचे उखडले गेलेले पुतळे सन्मानाने बसवतांना कुणी कचरणार नाही, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताकडे डोळे वटारून पहाण्याचे कुणाचे धाडस होणार नाही.

– सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२१)